मुंबई (Mumbaiu) : मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) विकासामुळे होणाऱ्या बदलांचा परिणाम म्हणून 'नैना' (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएंस नोटिफाईड एरिया) परिसरातील १२ नोडची विकासकामे आता एकाच टप्प्यात हाती घेण्यात येणार आहेत. सिडकोने (CIDCO) या कामांसाठी एक आराखडा खासगी कंपनीकडून तयार करून घेतला आहे. आगामी महिन्यात हा आराखडा पूर्ण होताच सिडको १४,३२१ कोटी रुपयांच्या कामांची टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू करणार आहे.
काय आहे नैना प्रकल्प?
मुंबई महानगर क्षेत्रात तिसऱ्या शहराची निर्मिती म्हणून नैना प्रकल्प विकसित होत आहे. मुंबई शहरात लोकसंख्येतील वाढती घनता लक्षात घेऊन नवी मुंबईनंतर आता तिसर्या मुंबईची निर्मिती सुरू झाली आहे. मुंबईच्या तिप्पट आकाराची ही तिसरी मुंबई 174 गावांसह 371 चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत विस्तारणार आहे.
अत्याधुनिक आणि शैलीदार महामार्ग, मल्टिमॉडेल कॉरिडोर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोकणकडे जाणारा सागरी महामार्ग, मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेला जोडणारे द्रुतगती महामार्गाचे जाळे असणारी ही अद्भुत तिसरी मुंबई असणार आहे.
सिडकोचे महत्त्वाचे पाऊल
रायगड जिल्ह्यात नैना प्रकल्पातून आकाराला येणार्या या नव्या शहरात पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तर अत्याधुनिक रस्त्यापर्यंत अनेक सोयीसुविधा आकाराला येत आहेत. पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 14 हजार 321 कोटी रुपये खर्च करून रस्ते उभारणार आहे. नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाट्याने विकास व्हावा, यासाठी सिडकोने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. भविष्यात हा विस्तार रोह्यापर्यंत जाणार आहे.
एक्स्प्रेस-वेशी थेट कनेक्ट
मुंबई एमएमआर प्रदेशात पालघर आणि रायगड जिल्ह्यांचे मुख्यालय, अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत हा सर्व विभाग घेण्यात आल्याने तिसर्या मुंबईच्या कार्यक्षेत्रात हा भाग येत आहे. सध्या कर्जत हा हरित तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबईला दूध पुरवणार्या प्रमुख भागात कर्जतचा समावेश आहे. खोपोली, खालापूरमध्ये बर्याच प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. हा सर्व भाग आता तिसर्या मुंबईत समाविष्ट झाला आहे.
तिसरी मुंबई ही थेट मुंबई एक्स्प्रेस-वेला जोडली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणाचा भाग येईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणकडे जाणारा सागरी महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अशा महामार्गांचे जाळेही येथे सामाविष्ट आहे.
नैना क्षेत्रातील विकासकामे वेगाने होत आहेत. याबाबत स्थानिक गावकरी नाराजी व्यक्त करीत नैना प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सिडकोकडून नवीन क्षेत्राचा विकास होताना एकसंध न होता तुकड्या तुकड्यात केला जातो. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या भूखंडांना योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे यावर विशेष लक्ष देत सिडको आता नैना भागातील 12 नोडची विकासकामे टप्प्याटप्प्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे.
याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीला काम दिले आहे. एकदा आराखडा तयार झाला की, पुढील महिनाभरात सिडको टेंडर काढून कामे हाती घेणार आहे. या संपूर्ण कामासाठी सिडकोला साधारणत: 14 हजार 321 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मल्टिमॉडेल कॉरिडोर अन् बरेच काही
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (सिडको) विकसित केले जाणारे नैना हे 371 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले सुनियोजित शहर आहे. 2013 मध्ये तिसर्या मुंबईची घोषणा विमानतळ परिसरात होणारी बेशिस्त वाढ रोखण्यासाठी करण्यात आली. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि प्रस्तावित ट्रान्स्पोर्ट कॉरिडोर जसे मल्टिमॉडेल कॉरिडोर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हे महत्त्वाचे ठरणार आहेत.
जानेवारी 2013 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि ठाणे तालुक्यातील एकूण 270 महसुली गावांचा समावेश आहे. या अधिसूचनेनुसार अंदाजे 560 कि.मी.मध्ये पसरले होते. तथापि, सरकारी आदेशानुसार गावे वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रात हलविण्यात आल्याने या प्रकल्पात काही अडथळे निर्माण झाले. सध्या, या प्रकल्पाचा भाग म्हणून एकूण गावांची संख्या 174 आहे.