मुंबई (Mumbai) : भाईंदर ते कल्याण या ५० किमी लांबीच्या राष्ट्रीय जलमार्ग-५३ प्रकल्पांतर्गत चार जेट्टींसाठी सुमारे १०० कोटींचे टेंडर येत्या दोन महिन्यांत काढण्यात येणार आहेत. एकूण १० स्थानके अर्थात जेट्टींचा समावेश असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भाईंदर, काल्हेर, कोलशेत आणि डोंबिवली या चार जेट्टींच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर सुरवात करण्यात येणार आहे. पुढच्या दोन वर्षांत जेट्टीचे काम पूर्ण करण्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाचे नियोजन आहे. (Inland Water Transport News)
मुंबई महानगरातील झपाट्याने विकसित होत असलेल्या भाईंदर, वसई, डोंबिवली, कल्याण या शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच सध्या असलेल्या वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सागरी मंडळाने आता जलवाहतुकीचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार भाईंदरला थेट कल्याणशी जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. सागरमाला योजनेअंतर्गत ५० किमी लांबीचा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून, या जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग-५३ नावाने ओळखले जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत भाईंदर ते कल्याण दरम्यान १० स्थानके अर्थात जेट्टी बांधण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील भाईंदर, काल्हेर, कोलशेत आणि डोंबिवली या चार जेट्टीच्या कामास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर आता दीड ते दोन महिन्यांत बांधकामासाठी टेंडर काढण्यात येणार आहेत. टेंडर प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर कामास सुरवात करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन वर्षांत जेट्टीचे काम पूर्ण करण्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे भाईदर ते कल्याण हे अंतर जलमार्गे वेगात पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना दोन ते अडीच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
या चार जेट्टींच्या कामासाठी ९९ कोटी ६८ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून, या निधीस १५ फेब्रुवारीला मान्यता मिळाली आहे. सागरमाला योजनेनुसार यातील ५० टक्के निधी केंद्र सरकारकडून तर ५० टक्के निधी राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. हा संपूर्ण ५० किमीचा जलमार्ग सेवेत दाखल झाल्यास भाईंदर ते कल्याण हे अंतर कमी वेळात कापता येणार आहे.