औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद, जालना व बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) बहूतांशी काम पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या महामार्गाचे अद्याप उद्घाटन देखील झाले नाही. त्यामुळे या महामार्गावरून अधिकृतपणे वाहतूकीस परवानगी दिलेली नाही किंवा वाहतुकीची अधिकृतपणे तशी घोषणाही एमएसआरडीसीच्या वतीने करण्यात आलेली नाही. असे असताना या महामार्गावरून अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक वर्दळ सुरू आहे. परिणामी या महामार्गावर काही ठिकाणी अपघात होऊन जिवितहानी देखील झालेली आहे. यामुळे एमएसआरडीसीच्या मुख्य अभियंता बी. पी. साळुंखे यांनी वाढत्या अपघाताचे सत्र रोखण्यासाठी अधिकृतपणे वाहतूकीची घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा वाहतूकीसाठी वापर करू नये असा फतवाच काढला आहे. तसा सुचना फलक देखील या महामार्गावर लावण्यात आला आहे.
उद्घाटनची तारीख पे तारीख
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे २ मे रोजी उद्घाटन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयारी सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात नागपूर ते सेलू बाजार असा २१० किमीचा मार्ग खुला करणार होते. त्यानंतर शिर्डीपर्यंत टप्प्याटप्प्याने पुढील मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा एमएसआरडीसीने निर्णय देखील घेतला होता. मात्र, पॅकेज ५ मधील कंत्राटदार आर्थिक अडचणीत आल्याने तेथील काम रखडले. त्यामुळे या टप्प्यातील कंत्राटदार बदलण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर आली होती.
अर्धवट बांधकामे, कोरोना, अतिवृष्टीचा बाधा
विविध कारणांमुळे पॅकेज ७ मधील काही पुलांचे काम रखडले होते. तसेच करोनाचा प्रादुर्भाव मनुष्यबळाचा तूटवडा, त्यामुळे स्थापत्यविषयक बहूतांश ठिकाणी किरकोळ कामे बाकी आहेत. विशेष म्हणजे टप्पा क्रमांक ११ मध्ये अतिवृष्टीच्या काळात कोपरगावमधील गोदावरी नदीवरील पुलाचे काम पाण्याच्या प्रवाहामुळे करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अद्याप ही कामे अपूर्ण असल्याने समृद्धी महामार्ग उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला. वाईल्ड लाईफ व्होहर पाथ नागपूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामधे विशेष अर्च तयार करण्यात आले आहेत. त्यातील १०५ नंबरचे अर्च मुसळधार पावसाने खराब झाले आहेत. त्यामुळे ते सुपर स्ट्रक्चर नव्याने बनवायचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत.
दरम्यान पहिल्या टप्प्यात ५२० किलोमीटरपैकी ३६० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा निर्णय घेतला होता. यातील नागपूर ते सेलू बाजार हा २१० किलोमीटरचा रस्ता आणि सिंदखेराजा ते वैजापूर १५० किलोमीटर रस्ता सुरू होणार होता. मात्र यात सेलू बाजारनंतर १२० किलोमीटर अंतर बाह्य रस्त्याने पार करून वाहनांना पुन्हा सिंदखेराजा ते वैजापूर प्रवास समृद्धी महामार्गावरून करावा लागला असता. तसेच मधल्या टप्प्यातही काही पुलांची कामे अद्याप पूर्ण नसल्याने वाहनांना आणखी काही ठिकाणी बाह्य रस्त्यांवरून प्रवास करावा लागण्याची चिन्हे होती. परिणामी पहिल्या टप्प्यात नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजारपर्यंतचा २१० किमी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने डिसेंबरअखेरपर्यंत नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
काय म्हणतात अधिकारी
उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. औरंगाबाद ते जालना आणि बुलढाणा ते वाशिम एकुण २०६ किमीपर्यंत आमची हद्द आहे. अद्याप काही किरकोळ कामे बाकी आहेत. ट्राफिक पेट्रोलियम फोर्स, स्पीडगन कॅमेरे, साईनबोर्ड आदी सुरक्षाविषयक कामे बाकी आहेत. सुरुवातीला वाहन वेगमर्यादा १२० किमी प्रतितास ठरली आहे. अद्याप वाहतूकीची अधिकृत घोषणा झाली नसल्याने वाहनधारक व नागरिकांना आमची विनंती आहे कुणीही या महामार्गाचा वापर करू नये.
- बी. पी. साळुंखे, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी.
महामार्गाची लांबी - ७०१ किलोमीटर.
खर्च - ५५ हजार कोटी.
मार्गिका - ३+३.
शहरांना जोडण्यासाठी प्रस्तावित इंटरचेंज - २४.
कोठून जाणार - १० जिल्हे, २६ तालुके, ३९२ गावे.
रस्त्याची निर्मिती - १५० किमी प्रतितास वाहने चालू शकतील
सुरुवातीला वाहन वेगमर्यादा - १२० किमी प्रतितास