औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या हद्दीतील एपीआय कॉर्नर ते प्रोझोन माॅल दरम्यान भारत बाजार येथे येणारे कारमालक नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर आणि फुटपाथवर कुठेही आणि कशाही गाड्या लावतात. चार दिवसांपूर्वी येथे ट्रक आणि कारचा अपघात झाला. त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी सिडको वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने तसेच एमआयडीसी.पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांना कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईमुळे कोट्यवधींच्या नव्याकोऱ्या रस्त्याचा श्वास मोकळा झाल्याने औरंगाबादकरांनी पोलिस आयुक्तांचे आभार मानले आहे.
धडक कारवाई सुरू
वाहनांना दंड आकारण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे बुधवारी सायंकाळी थेट तीन व्यावसायिकांचे कार एक्ससरीज, कोटींगची मशिनरी व इतर साहित्य जप्त करून थेट एमआयडीडी पोलिस स्टेशन येथे तीन व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केल्याने आता भारत बाजार समोरील रस्त्यावर बेदरकारपणे वाहन उभी करणाऱ्या वाहनचालकांना आणि येथील व्यावसायिकांना यामुळे आळा बसणार आहे. हा सार्वजनिक रस्त्यातील अडथळे दुर होऊन रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
भारत बाजार येथे कार एक्ससेससरीज, कोटींग आणि फिल्म तसेच म्युझिक सिस्टीम आणि सीटकव्हर तसेच कार डेकोरेट आणि बॅटरीची मोठी दुकाने आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी औरंगाबादसह जिल्ह्यातील कारमालक मोठ्या संख्येने दररोज येथे येतात. बहुतांश गाड्या या शोरूम मधुन थेट इकडे दाखल होतात. ही वाहने भारत बाजार समोरील रस्त्यावरच उभी करून कामे केली जातात. त्यामुळे सकाळ ते सायंकाळपर्यंत वाहनांच्या गर्दीने येथे रस्ताच ब्लाॅक होऊन अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता.
पोलिस आयुक्तांचे कडक कारवाईचे आदेश
एका अपघाताचे फोटो समाज माध्यमांवर झळकताच कोणत्याही परिस्थितीत वाहने रस्त्यावर उभी केली जाऊ नयेत, यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे आणि सिडको वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी कारवाईचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांना आता हरताळ लागु नये असा सुर मार्गस्थांकडुन निघत आहे.
एमआयडीसीतील महत्त्वाचा रस्ता
चिकलठाणा एमआयडीसीतील हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण काही महिन्यांपूर्वी झाले आहे. यासाठी ५ कोटी ५ लाख ६९ हजार ७७५ रूपये खर्च करण्यात आला. सरकारने या रस्त्याच्या बांधकामासाठी एमआयडीसीची एजन्सी म्हणुन नियुक्ती केली होती. जळगावची मे. लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनी आणि पुण्याची आर.जे. बिल्डकाॅन प्रा. लि. मार्फत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासकांनी घोषित केला आदर्श रस्ता
या रस्त्याचे काम झाल्यावर महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी आदर्श रस्ता म्हणुन तो घोषित केला. मात्र भारत बाजारसह प्रोझोन माॅल व चिकलठाणा औद्योगिक वसाहती अंतर्गत स्माॅल स्केल इंडस्ट्रीज मध्ये येणाऱ्या जड वाहनांनी फुटपाथ वरील भुमिगत पाईपांच्या ड्रेन चेंबरला धक्का लावत फोडाफोडी केल्याने फुटपाथवर भगदाड पडली आहेत.
नव्या रस्त्यावर भंगार वाहनांचा कब्जा
शिवाय या रस्त्यावर इतर ठिकाणीही वाहने उभी करण्याचे प्रकार सध्याही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक ऑटोरिक्षा, चारचाकी आणि रूग्णवाहिकांना यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यातून वाहतुकीच्या कोंडीची समस्या वारंवार घडत आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एका अपघाताचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. पर्याय म्हणून पोलिसांनी आता रस्त्यावर उभा केलेल्या वाहनाचे फोटो काढून अशा वाहनावर ऑनलाइन दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.किमान पाचशे ते हजार रूपयांपर्यंत संबधित वाहनमालकाला दंड भरावा लागत आहे. रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाचा पोलिस कर्मचारी फोटो काढतात आणि कायदेशीर कारवाई सुरू करतात.
महापालिका प्रशासकांनी लक्ष द्यावे
महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी या रस्त्याला आदर्श रस्ता हे गोंडस नामकरण करून मोठ्या थाटात लोकार्पन सोहळा पार पाडला. मात्र जिथे जिथे वाहतूकीचा चक्काजाम होतो त्याठिकाणी नो पार्किंगचे फलक लावायचा विसर पडला. परिणामी पोलिसांचा तान वाढला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने येथे तुर्तास एका वाहतूक शाखेच्या कर्मचार्याची नियुक्ती केली आहे. असे असले तरी महापालिका प्रशासकांनी देखील वाहतूक शाखेचा भार हलका करण्यासाठी पायाभुत सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांच्या कर्तव्याचा त्यांना विसर पडू नये.
फुटपाथवर रसवंती
विशेष म्हणजे पोलिस या मार्गावर धडक कारवाई करत असताना महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे गुऱ्हाळ करून थेट भारत बाजार समोरच फुटपाथवर शिवाजी चव्हाण या ईसमाला रसवंतीचा परवाना दिल्याने महापालिकेचा बेफिकिरी कारभाराचे दर्शन होत आहे. पोलिसांनी वाहनांवर कारवाई करताच वाहन मालक रसवंतीकडे बोट दाखवत आहेत. रसवंती चालक पोलिसांच्या हातात महापालिकेचा परवाना टेकवत असल्याने पोलिस देखील महापालिकेच्या अजब कारभारावर हताश होत आहेत.