औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन-२ मुकुंडवाडी चौकातील सोहम मोटर्स ते एन-३ व एन-४ व उच्च न्यायालयाला जोडणाऱ्या सर्व्हिस रस्त्याची प्रचंड खड्डेमय अवस्था झाली आहे. खड्डय़ांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता सोहम मोटर्स ते हाॅटेल दिपालीपर्यंत व्हाईट टाॅपिंग रस्त्यासाठी एक कोटी रूपये २०२३ ते २०२४ च्या बजेटमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात आमदार अतुल सावे यांनी महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना नुकतेच पत्र दिल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र येणाऱ्या अर्थसंकल्पात ठेवलेल्या निधीतून हा अर्धवट रस्ता होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मग हाॅटेल दिपाली ते उच्च न्यायालय या पुढच्या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे. यासाठी आमदार अतुल सावे यांनी महापालिका प्रशासकांना किमान दोन कोटीच्या बजेटची अर्थसंकल्पात तरतूद करून एकाचवेळी रस्त्याचे काम पूर्ण करावे व नागरिकांना खड्ड्याच्या साडेसातीपासून मुक्त करावे. याकडे प्रशासनाने चालढकल न करता तातडीने काम पूर्ण करावे, यासोबतच तुर्तास खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून सुसाट धावणाऱ्या वाहनांना लगाम घालण्याची देखील स्थानिकांतून मागणी होत आहे.
सोहम मोटर्स ते उच्च न्यायालय या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या डांबरी रस्त्याची बहुतांशी पाठ उखडून गेली आहे. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्याठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात कुठे काँक्रिट ते कुठे पेव्हरब्लाॅक टाकून महापालिकेने काॅकटेल रस्ता तयार केला आहे. काँक्रिट आणि पेव्हरब्लाॅक उखडल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी अधिक धोकादायक बनला आहे. गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची अशी स्थिती असूनही प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल टेंडरनामाकडून उपस्थित केल्यावर महापालिका प्रशासनाने आता आमदार अतुल सावेंच्या पत्रानंतर २०२३-२४ च्या बजेटमध्ये एक कोटी रूपये ठेवणार असल्याचे म्हणत सोहम मोटर्स ते हाॅटेल दिपालीपर्यंत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सोहम मोटर्स ते उच्च न्यायालय हा अखंडीत सर्व्हिस रस्ता आहे. पुढे हाॅटेल दिपाली ते उच्च न्यायालय हा रस्ता देखील पूर्णपणे धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिका अधिकाऱयांनी या रस्त्याची पाहणी करून एकदाच संपुर्ण रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
जालना रस्त्याला समांतर सर्व्हिस रस्ता कोणी केला गायब?
सोहम मोटर्स ते उच्च न्यायालय हा सर्व्हिस रस्ता जालना रस्त्याला समांतर आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी म्हणून तत्कालीन सिडको प्रशासनाने हायकोर्ट ते सोहम मोटर्स ते मुकुंदवाडी जे सेक्टर ते संजयनगरमधुन श्रीरामनगर-विठ्ठलनगर ते मुर्तिजापूर असा जालना रस्त्याच्या शेजारीच पाच किमीचा सर्व्हिस रस्ता तयार केला होता. सर्व्हिस रस्त्याला लागुनच मोठी बाजारपेठ, बँका, मुकुंदवाडी पोलिस स्टेशन आहे. शिवाय शाळा, महाविद्यालय, छोटीमोठी रूग्णालये तसेच सोन्याचांदीची नामांकित दालने, हाॅटेल्स आहेत. अत्यंत गजबजलेल्या अनेक नागरी वसाहतीतून जाणारा हा सर्व्हिस रस्ता अनेक ठिकाणी अतिक्रमणाने गायब झाला आहे. परिणामी जालना रस्त्यावर कायम वाहतूकीची कोंडी असते. सिडकोतील विकास आराखड्याप्रमाणे महापालिकेने हा सर्व्हिस रस्ता मोकळा केला, तर जालना रस्त्याला अखंडीत पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकतो व जालना रस्त्यावरची कोंडी फूटू शकते. सद्य:स्थितील मनपात प्रशासकीय राजवट आहे. दुसरीकडे सिडकोतील अतिक्रमणांच्या मुद्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या सर्व्हिस रस्त्याचा श्वास मोकळा होऊ शकतो.
निदान आहे त्या सर्व्हिस रस्त्याची सर्व्हिस करा
अगदी जालना रस्त्याच्या शेजारीच असलेल्या या संपूर्ण सर्व्हिस रस्त्याची टेंडरनामाने पाहणी केली. या रस्त्याने मोठय़ा प्रमाणात वाहनधारकांची ये-जा असते. नेहमी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. सिडको एन-२ मुकुंदवाडी भागातील मुर्तिजापूर, म्हाडा काॅलनी, श्रद्धा काॅलनी, तोरणागडनगर, विठ्ठलनगर, श्रीरामनगर, मुकुंदवाडी जुनेगाव, संजयनगर, जे सेक्टर तसेच कासलीवाल-सारा गार्डन, मायानगर, विवेक सोसायटी, जुनी एसटी काॅलनी, प्रबोधनकार ठाकरेनगर, सिडको एन-३ व एन-४ आदी भागातील वाहनधारकांना या खड्डेमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डय़ांचा अंदाज दुचाकीस्वारांना येत नसल्याने अपघातांच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यामुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.