मुंबई (Mumbai) : मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांबीचा अटल सेतू (Atal Setu) जिथे उतरतो आणि सुरू होतो त्या जासई येथे विविध सुविधा उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए - MMRDA) टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. जासई येथे सर्वसुविधांनी सज्ज फूड कोर्ट आणि पेट्रोल पंप उभारण्याचे प्रस्तावित आहे.
मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच मुंबई शहर आणि नवी मुंबई यामधील दळणवळण वाढण्याच्या दृष्टीने 2004 पासून मुंबई पारबंदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 21.8 किमी लांबीचा सहा लेनच्या समुद्री मार्गाचे बांधकाम हाती घेतले. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे (एमटीएचएल) नामकरण 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे.
अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेत ही सुधारणा होणार आहे.
हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग 348 वर चिरले येथे जोडला आहे. या पुलामुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येत असल्याने जेएनपीटी, पुणे, अलिबाग, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांची सोय झाली आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जासई येथे अटल सेतू प्रकल्प स्थळावरील पेट्रोल पंपासाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी वेसाईड सुविधांचे संचालन आणि देखभाल यासह व्यावसायिक सुविधा, घटकांचे नियोजन, डिझाईन, अभियांत्रिकी, वित्तपुरवठा, बांधकाम, विकास यासाठी एमएमआरडीएने टेंडर प्रसिद्ध केले आहे. याजागेत दोन फूड प्लाझा आणि दोन पेट्रोल पंपांची उभारणी करण्यात येईल.
३० वर्षांच्या कालावधीसाठी हे टेंडर देण्यात येईल. पेट्रोल पंप, मोटेल, वेसाइड रेस्टॉरंट, सर्व्हिस स्टेशन, हायवे मॉल्स, हायपर मॉल्स, सार्वजनिक सुविधांसह शौचालये इत्यादी सुविधांसाठी केवळ या परिसराचा वापर करता येणार आहे. वेसाईड सुविधांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्राच्या विकास नियंत्रण विनियम कायदे किंवा नियमांनुसार परवानगी असलेल्या इतर घटकांचा विकास करण्याची मुभा ठेकेदाराला आहे.
मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांबीच्या अटल सेतूवरुन जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान तब्बल ५० लाख वाहने धावली आहेत.
या सुविधा उभारणार -
- कारसाठी पार्किंगची जागा
- गॅरेज; वाहनांच्या किरकोळ दुरुस्ती आणि सेवांसाठी
- शौचालये: पुरुष, महिला आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी स्वतंत्रपणे
- रेस्टॉरंट/फास्ट फूड/ढाबा, कॅफेटेरिया, जेवण, हँडवॉश एरिया
सेवा क्षेत्राच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी
- सांडपाणी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था
- 24 x 7 पाणी आणि वीज सुविधा
- पाणी साठवण टाकी, सांडपाण्याचा पुनर्वापर
- सेप्टिक टॅंक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग
- वीज पुरवठा आणि डीजी संच
- प्रथमोपचार
- कचरा विल्हेवाट लावण्यासाठी डबे