नागपूर (Nagpur) : माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गंभीर दखल घेतलेली खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील फ्लाय ॲश पुन्हा कन्हान नदीत वाहून गेली. त्यामुळे फ्लॅशची विल्हेवाट लावणारे कंत्राटदार मंत्री आणि अधिकारी यांच्या डोळ्यात धुळफेक करतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
फ्लाय ॲश कन्हान नदीत सोडल्या जात असल्याच्या तक्रार पर्यावरणवाद्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. कन्हान नदीतून नागपूरकरांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. दूषित पाणी नागपूरकरांना पिण्यासाठी दिले जात होते. या तक्रारीची गंभीर दखल आदित्य ठाकरे यांनी केली होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांना कारवाईची निर्देश दिले होते. याची शहनिशा करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता. वीज निर्मितीच्या अधिकाऱ्यांनी यापुढे कन्हान नदीत राख टाकली जाणार नाही असे आश्वासन दिले होते. फ्लाय अश विल्हेवाट लावणाऱ्या कंत्राटदाराला स्वतंत्र जागेत फ्लाय ॲश टाकण्याची तंबी दिली होती. मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा नदीत राख वाहून आली. त्यावरून कंत्राटदाराने सहा महिने दिशाभूल केली असल्याचे उघड झाले आहे. परखेडा येथील फ्लायॲश कन्हान नदीत येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे सोमवारी नेहरूनगर, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील फ्लाय ॲशमुळे नंदगाववासी त्रस्त होते. येथील नागरिकांची दखल घेत फेब्रुवारीमध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नंदगावला भेट दिली. त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचे आदेश दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने खापरखेडा औष्णिक केंद्राचे कान टोचले होते.