मुंबई (Mumbai) : मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प-पॅकेज चार अंतर्गत मुंबई महानगरपालिकेने २.६० मीटर व्यास असलेल्या भूमिगत मलजल बोगद्याचे खोदकाम हाती घेतले आहे. बापट नाला आणि सफेद पूल नाल्यापासून धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पापर्यंत हा बोगदा तयार करण्यात येत आहे. पर्यावरणस्नेही प्रकल्पाचे एकूण तीन टप्प्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम नुकतेच मंगळवारी, १३ जून रोजी पूर्ण झाले. १ ऑक्टोबर २०२१ पासून हा प्रकल्प सुरू असून, ४८ महिन्यांत म्हणजेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
बापट नाला आणि सफेद पूल नाल्यातून मिठी नदीत जाणारे अंदाजे १६८ दशलक्ष लिटर प्रतिदिन इतके पाणी या भूमिगत मलजल बोगद्यादवारे धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्रात वाहून नेण्यात येणार आहे. तेथे मलजलावर प्रक्रिया करून माहीम निसर्ग उद्यान येथील खाडीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मिठी नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, पर्यावरणाचेही संतूलन टिकून राहणार आहे. एकूण तीन टप्प्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. कुर्ला उद्यान येथे पहिल्या टप्प्यातील मलजल बोगद्याचा 'ब्रेक-थ्रू' घेण्यात आला. यानंतर या प्रकल्पातील कनाकिया झिलिऑन (एससीएलआर जंक्शन), सहार- कुर्ला जोड रस्ता येथे दुसरा आणि बापट नाला येथे तिसरा टप्पा घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन मलजल वाहून नेण्याची असून, सध्या यातून १६८ दशलक्ष लिटर प्रतिदिन बिगर पावसाळी प्रवाह वाहून नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ६.७० किलोमीटर इतकी आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे १.८३५ किलोमीटर इतके काम पूर्ण झाले आहे.
भूमिगत मलजल बोगद्याची एकूण लांबी ६.७० किलोमीटर असून, सरासरी खोली सुमारे १५ मीटर आहे. भारतातील सर्वात लहान व्यासाचा असा हा मलजल बोगदा असून, या बोगद्याचा अंतर्गत व्यास २.६० मीटर आहे. तसेच बाह्य व्यास ३.२० मीटर आहे. या बोगद्याच्या संरेखनामध्ये एकूण ५ शाफ्ट प्रस्तावित आहेत. १ ऑक्टोबर २०२१ पासून हा प्रकल्प सुरू असून, ४८ महिन्यांत म्हणजेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पहिला 'ब्रेक-थ्रू' यशस्वी!
हा मलजल बोगदा सेगमेंटल लाइनिंग पद्धतीने तसेच अर्थ प्रेशर बॅलन्स टनेल बोरिंग मशीन वापरून बांधला जात आहे. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी धारावी मलजल प्रक्रिया केंद्र येथे या तीन टप्प्यापैकी पहिल्या टप्प्यातील बोगद्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर १.८३५ किलोमीटर लांबीपर्यंत खणन पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दुपारी कुर्ला उद्यान येथे पहिला 'ब्रेक-थ्रू' घेण्यात आला.
२०५१ पर्यंतचे नियोजन
दुसऱ्या टप्प्यातील भूमिगत बोगद्याचे खणन कुर्ला उद्यानापासून सुरू होईल आणि लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता जंक्शन शाफ्ट, सहार- कुर्ला रस्ता येथे पूर्ण होईल. या दुसऱ्या टप्प्यातील बोगद्याची लांबी १.८० किलोमीटर इतकी असेल. यानंतर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील बोगद्याचे काम सुरू होणार आहे. अंतिम टप्प्यातील बोगदा ३.१० किलोमीटर लांबीचा राहणार असून, तो सांताक्रूज-चेंबूर जोड रस्ता जंक्शन शाफ्ट ते बापट नाला असा खोदण्यात येणार आहे. या बोगद्याची एकूण वहन क्षमता ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन मलजल इतकी आहे. मात्र सध्या त्यातून केवळ १६८ दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका बिगर पावसाळी प्रवाह वाहून नेण्यात येणार आहे. मुंबईतील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेत २०५१ पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई मलनिःसारण प्रकल्प अंतर्गत हा भूमिगत मलजल बोगदा बांधण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (अभियांत्रिकी) राजेश पाटगावकर, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम करण्यात येत आहे.