मुंबई (Mumbai) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहनांच्या वेगासह अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात एचटीएमएस) अंतर्गत येत्या ३ महिन्यात ९३ ठिकाणी ३७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एमएसआय प्रोटेक सोल्यूशन्सला हे टेंडर दिले आहे. १० वर्षांसाठी सुमारे ३४० कोटी रुपयांचा खर्च या कामावर होणार आहे.
एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरातील प्रवास वेगवान झाला आहे. परंतु एक्स्प्रेस-वेवरील वाढते अपघात हा गंभीर विषय बनला आहे. आरटीओने राबविलेल्या सुरक्षा मोहिमेमुळे मुंबई ते पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघात घटले असले तरी ते पूर्णपणे थांबले नाहीत. जानेवारी ते एप्रिलदरम्यान एक्स्प्रेस-वे वर ७४ अपघात झाले. एक्स्प्रेस-वे वरील अपघातांमध्ये गाड्यांचा भरघाव वेग हे प्रमुख कारण आहे. परिणामी वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने एचटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार दर चार किमी अंतरावर वेग तपासणारी यंत्रणा, मार्गिका तोडली जात आहे किंवा कसे, याबाबतची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवणारी विशेष प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे.
लोणावळ्याजवळ कुसगाव येथे एक नियंत्रण कक्ष असणार आहे. जेथे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि महामार्ग गस्त सीसीटीव्हीचे निरीक्षण करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलन जारी करतील. सध्या आरटीओकडून दिवसा स्पीड गन असलेली एक किंवा दोन वाहने तैनात आहेत. एक्स्प्रेस-वेवर ९५ टक्के अपघात हे ओव्हरस्पीडिंगमुळे होतात. एक्स्प्रेस-वेवर कारसाठी कमाल वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रतितास आहे, तरीही काही वाहने ताशी १५० किमीपर्यंत जातात. नव्या प्रणालीमुळे अतिवेगाने वाहन चालविणे, मार्गिका तोडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणे सोपे होणार आहे.