मुंबई (Mumbai) : एकीकडे नवी मुंबईतील म्हाडाची घरे विकत घेण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ लागलेली असताना दुसरीकडे मात्र मुंबई महानगर प्रदेशातील नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील खासगी प्रकल्पांतील घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात खासगी प्रकल्पांतील सुमारे ३० हजार घरे ग्राहकांअभावी पडून आहेत.
गेल्या काही वर्षापासून सिडको नव्या घरांची निमिर्ती करत आहेत. ही घरे सर्वसामान्यांना परवडत असल्याने मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. अशाप्रकारे सिडकोच्या वतीने मागील पाच वर्षांत जवळपास २५ हजार घरे बांधून त्यांचे वाटप करण्यात आले आहे, तर पुढील पाच वर्षांत आणखी ८७ हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे. या सर्वांचा परिणाम सर्वसामान्य लोकांनी खासगी विकासकांच्या घरांकडे पाठ फिरवल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षात म्हणून रायगडमध्येही गृहसंकुले उभारण्यास लोकांनी पसंती मिळत आहे, त्यामुळे या परिसरातील पनवेल, कर्जत, पाली, खालापूर आदी भागांत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत, यामुळे महामुंबई क्षेत्रात जुन्या प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरांना ग्राहक मिळत नसल्याची माहिती क्रेडाई-एमसीएचआयने अलीकडेच केलेल्या पाहणीत समोर आली आहे. त्यामुळे ती विकण्यासाठी विकासकांची धडपड सुरू आहे.
म्हाडा आणि सिडकोच्या घरांमुळे आता खासगी विकासकांना त्यांच्या घरांसाठी ग्राहकांची शोधाशोध करावी लागत आहे. विक्री न झाल्याने अनेक घरे बांधून पडून आहेत. ही शिल्लक घरे विकण्यासाठी विकासकांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. ग्राहकांना आकर्षक सवलती देण्यात आहे. मालमत्ता प्रदर्शन आयोजित करुन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही पदरी निराशा येत असल्याने खासगी विकासक सध्या चिंतेत आहेत.