नवी दिल्ली (New Delhi) : दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुड न्यूज दिली आहे. हायस्पीड रेल्वेमार्गासाठी ३२ टक्के जमिनीचे संपादन बाकी असून, ६८ टक्के भूसंपादन झाल्याचे माहिती फडणवीस यांनी दिली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाला लागून असलेली जमीन हायस्पीड रेल्वेमार्गासाठी वापरण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांनी सांगितले की, हायस्पीड रेल्वेसाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच राखून ठेवण्यात आलेली जमीन वापरण्याबात विचार सुरू असून, त्याबाबतचा प्रस्ताव आम्ही देणार आहोत. या प्रकल्पासाठीची ६८ टक्के जमीन संपादीत करण्यात आली असून ३२ टक्के जमीन ताब्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
फडणवीस यांनी या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विकासकामांसाठी रेल्वेमंत्री वैष्णव आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, हायस्पीड रेल्वेसोबतच हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वेचीही मागणी केली होती; परंतु त्यातील काही अडथळे दूर करावे लागणार आहे. त्याला पर्याय म्हणून रस्त्यालगत रेल्वे असा प्रस्ताव आम्ही करणार आहोत. नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी रेल्वे मंत्र्यांनी ४७२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.