मुंबई (Mumbai) : राज्यातील टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत उड्डाणपूलांसाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्यांची श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईत सुमारे ५५ उडाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी एमईपी इन्फ्रा (MEP Infrastructure) या कंपनीस सन २०१० पासून मुंबईच्या प्रवेश द्वारावर टोल वसूल करण्यास परवानगी दिलेली आहे. तथापि या उड्डाणपुलांसाठी झालेल्या खर्चाची वसुली पूर्ण होऊनही संबंधित कंपनीद्वारे टोलवसुली सुरु आहे. त्याचा नाहक भुर्दंड राज्यातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे.
याचप्रमाणे राज्यातील अनेक टोलसंदर्भात खर्च वसुली पूर्ण होऊन देखील गत काही वर्षांपासून टोल वसूली सुरु आहे. टोलवसुलीची खरी आकडेवारी संबंधित कंपन्यांकडून लपविली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार होत असल्याची बाब निदर्शनास आली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता रस्ते, उड्डाणपूल यासाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्यांची श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.