Ambadas Danve : शिंदे-फडणवीस-पवार सरकाराच्या योजना फक्त कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहेत का?

Maharashtra Budget 2024 : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
Ambadas Danve
Ambadas DanveTendernama
Published on

Maharashtra budget 2024 मुंबई : मोठा गवगवा करत पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतूला (Atal Setu) भेगा पडल्या यावरून जनतेच्या पैशांचा कशाप्रकारे अपव्यय होतो हे सिद्ध होते. जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजनेचा टप्पा पहिला पूर्ण झाला आणि दुसरा टप्पा पूर्ण होत असताना हजारो टँकर का लावले गेले. अनेक ठिकाणी १३०० टँकर सुरू होते. या योजना कंत्राटदरांना (Contractor) पोसण्यासाठी आहेत, असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

Ambadas Danve
…तरच शक्तीपीठ महामार्गाचे काम; मंत्री दादाजी भुसेंचे स्पष्टीकरण

मराठी अस्मिता, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे हित जपण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. उद्योग क्षेत्राला महायुती सरकार मागे नेत असून तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे राज्यपालांचे अभिभाषण हे राज्याच्या हिताचे नाही, अशा शब्दांत राज्यपालांच्या अभिनंदनपर ठरावाला विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत विरोध दर्शविला.

राज्यपालांचे अभिभाषण हे निरस आहे. त्यांच्या अभिभाषणात सरकारच्या कामाचे प्रतिबिंब आले पाहिजे. मात्र हे अभिभाषण दिशाहीन, अर्थहीन व भरकटलेले असल्याची टीका दानवे यांनी केली.

गेल्या २० वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित महाराष्ट्र सीमा कर्नाटक प्रश्न, राज्यातील उद्योगधंद्यांची प्रगती, दावोसमधील गुंतवणूक व परराज्यात गेलेल्या उद्योगांवरून दानवे यांनी सरकारवर तोफ डागली.

सरकारचा आयात निर्यात धोरण हे शेतकरीविरोधी असून अनेक गोष्टी या गुजरातमधून निर्यात केल्या जातात. खारघर येथे ज्वेलरी पार्क उभारणार असल्याचा उल्लेख राज्यपालांनी आपल्या भाषणात केला. मात्र मुंबईतील हिरे मार्केट सुरतला गेले असल्याचे सांगत हे सरकार दुटप्पी भूमिका बजावत असल्याची टीका दानवे यांनी केली.

असंघटित कामगार मंडळ हे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या हितासाठी निर्माण केले. कामगारांच्या खात्यात थेट रक्कम देणारे धोरण सरकार आणत का नाही, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

Ambadas Danve
Solapur : मलनिस्सारण प्रकल्पाच्या 447 कोटींच्या टेंडरचा मार्ग मोकळा

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सोयगावच्या वैष्णवी राऊत या १९ वर्षीय मुलीला जळगावच्या रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. तो धसका घेऊन तिच्या वडिलांनीही आत्महत्या करत जीवन संपवले. या योजना होर्डिंग्ज व कागदपुरत्या न राहता जनतेपर्यंत पोहचण आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात अनेक असुविधा असून शिवसेनाप्रमुखांचे नाव वापरून सरकार पुतण्या मावशीचे प्रेम दाखवत असल्याची टीका दानवे यांनी केली.

मोठा गवगवा करत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतूला भेगा पडल्या यावरून जनतेच्या पैशांचा कशाप्रकारे अपव्यय होतो हे सिद्ध होतंय. जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा पहिला पूर्ण झाला आणि दुसरा टप्पा पूर्ण होत असताना हजारो टँकर का लावले गेले. अनेक ठिकाणी १३०० टँकर सुरू होते. या योजना कंत्राटदरांना पोसण्यासाठी आहेत का, असा सवाल असा दानवे यांनी उपस्थित केला. पाणी पातळी वाढली नाही यावरून भ्रष्टाचार होतोय हे स्पष्ट झाल्याचे दानवे म्हणाले.

खिशात नाही आना आणि मला बाजीराव म्हणा, अशी अवस्था राज्य शासनाची झाली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली. एक राज्य एक गणवेश घोषणा अपयशी ठरल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. राज्य क्रीडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांच्यावर क्रीडा साहित्य पुरवण्याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये मराठवाड्याचा सुद्धा उल्लेख आहे. मात्र मराठवाड्याच्या विकासासाठी ४६ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची विकास कामे हाती घेतल्याचे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात म्हटले. १६ सप्टेंबर २३ रोजी संभाजीनगरात बैठक झाली त्यातील एकाच कामाला मंजुरी मिळाली. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ पुन्हा कार्यान्वित होणे आवश्यक असल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Ambadas Danve
Davos : तीन वर्षातील एमओयूंची श्वेतपत्रिका काढणार; उद्योग मंत्री उदय सामंत

कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील अवर्षण ग्रस्त तालुके असताना मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळत नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा प्रश्न जैसे थे आहे. सिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे तो काढण्याची आवश्यकता असल्याचे दानवे म्हणाले.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यापीठ स्थापन करण्याची उल्लेख करण्यात आला मात्र अद्याप ते कागदावरच आहे. पैठणसाठी संत विद्यापीठ घोषित करण्यात आले परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही. मराठी भाषेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

तरुण रोजगारापासून वंचित आहेत. राज्य सरकार आल्यापासून साडेसहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ट्रिपल इंजिन सरकारचे तीन बाजूला तीन इंजिन असून ते वेगवेगळ्या भूमिका वठवत आहेत.

सध्याचे सरकार महाराष्ट्राला अधोगतीला घेऊन जात आहे. या सरकारच्या काळात तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकले असून शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार दोन समाजात भांडण लावण्याचं काम करत आहे, त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणात अभिनंदन करण्यासारखी कोणती बाब नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिनंदन प्रस्तावाला विरोध दर्शवित सरकारवर हल्ला चढविला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com