पुणे (Pune) : जुना पूल पाडल्यानंतर आता चांदणी चौकाच्या (Chandani Chowk) दोन्ही बाजूंकडील मार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (NHAI) आपला मोर्चा वळवला आहे. चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात डुक्कर खिंड ते चांदणी चौक या अर्धा किलोमीटर भागातील रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
अंतिम टप्प्यातील डांबरीकरण व इतर कामे शिल्लक असून, ती पुढील १५ दिवसांत होणार आहेत. त्यामुळे याठिकाणी चार ऐवजी सहा मार्गिका होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल, असे NHAI कडून स्पष्ट करण्यात आले आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘एनएचएआय’तर्फे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. या चौकातील एनडीए-पाषाण हा जुना पूल स्फोट करून पाडल्यानंतरही खडक फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रोज मध्यरात्री अर्धातास वाहतूक बंद ठेवून स्फोट करून चौकातील रस्ता मोठा केला जात आहे. पूल पाडल्यानंतर सातारा ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी पाच तर मुंबई ते साताऱ्याकडे जाण्यासाठी तीन मार्गिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच बरोबर चांदणी चौकातील इतर पर्यायी मार्गांचेही काम सुरू आहे.
डुक्कर खिंड ते चांदणी चौक या दरम्यान महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मार्गिका उपलब्ध आहेत. इतर ठिकाणच्या तुलनेत या ठिकाणी महामार्ग अरुंद असल्याने दोन्ही बाजूला गर्दीच्या वेळेस वाहनांच्या लांब रांगा लागतात. चांदणी चौक मोठा झाला असला तरी हा भाग अरुंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दरम्यान तिसरी मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनएचएआय’ने काम सुरू केले होते. दोन्ही बाजूला सुमारे २०० ते ३०० मीटर लांबीची भिंती बांधून रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध केली आहे. तेथील ८० टक्के काम पूर्ण झाले, पुढील १५ दिवसांत हे पूर्ण होणार असल्याने मुंबई ते सातारा व सातारा ते मुंबईची वाहतूक आणखी गतिमान होईल.
इतर मार्गांची अशी आहे स्थिती
- वेद भवनची न्यायप्रविष्ट जागा सोडून इतर जागेत सेवा रस्त्याचे रुंदीकरण सुरू
- एनडीए ते मुंबई मार्गिकेचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण होणार
- मुळशी ते कोथरूड रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाचे काम दीड महिन्यात पूर्ण होईल
- मुळशी ते मुंबई मार्गाचा भूसंपादनाचा तिढा सुटल्याने एका महिन्यात हा मार्ग खुला होईल
- मुळशी ते सातारा उड्डाणपूल जेथे संपतो तेथे ८४ मीटरचा पुला बांधून सेवा रस्ता करणार