मुंबई (Mumbai) : अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढील तीन वर्षांत मुंबई उपनगरातील सर्व २७ लाख वीज ग्राहकांच्या घरोघरी, दुकानात आरएफ स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्धिष्ट निश्चित केले आहे. येत्या वर्षात त्यापैकी सात लाख स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. यावर सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, तर एकूण 27 लाख मीटर बसवण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई उपनगरातील वीज ग्राहक पुढील तीन वर्षांत 'स्मार्ट' होणार आहेत. अदानी इलेक्ट्रिसिटीचे उपनगरात 27 लाख वीज ग्राहक आहेत. त्यांचा वीज वापर अचूक नोंदला जावा, ग्राहकाच्या वीज वापरावर देखरेख ठेवता यावी, वीजचोरीला आळा बसावा, प्रत्येक महिन्याच्या वीज मीटर रीडिंगच्या कटकटीतून सुटका व्हावी तसेच वीज बिल थकबाकीदाराचा वीज पुरवठा कार्यालयात बसून खंडित करता यावा म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढील तीन वर्षांत उपनगरातील सर्व वीज ग्राहकांच्या घरोघरी, दुकानात आरएफ स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा ग्राहकांबरोबरच वीज कंपनीला मोठा लाभ होणार आहे.
सध्या सर्वत्र डिजिटल वीज मीटर असल्याने ग्राहकाने वापरलेल्या विजेचे रीडिंग घेण्यासाठी दर महिन्याला घरोघरी जावे लागते. तसेच वीज बिल थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी प्रत्यक्ष मीटरच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी सध्या प्रायोगिक तत्त्वावर उपनगरात एक लाख दहा हजार स्मार्ट मीटर बसवले आहेत. 2025 पर्यंत सर्व 27 लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचे अदानी इलेक्ट्रिसिटीच्यावतीने सांगण्यात आले.
येत्या वर्षात सात लाख स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. एका मीटरची किंमत सुमारे दोन हजार आहे. त्यामुळे यावर सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, तर एकूण 27 लाख मीटर बसवण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना आपली तक्रार व्हिडीओ कॉलद्वारे (व्हर्च्युअल) कस्टमर केअर अधिकाऱयांकडे तक्रार नोंदवता येणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रा चॅटबॉटवर आता इंग्रजीबरोबरच मराठी आणि हिंदी भाषेतही चॅट करून ग्राहकांना आपल्या शंकेचे निरसन करता येणार आहे.