मुंबई (Mumbai) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Mumbai International Airport) धर्तीवर मुंबईतील १९ रेल्वे स्थानके विकसित करण्यात येणार आहेत. ९४७ कोटी रुपयांची ही योजना आहे. या स्थानकातील विकास कामाला डिसेंबर, २०२१ पासून सुरुवात हाेणार हाेती. पण, हा प्रकल्प रखडला होता. नुकतेच या १९ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाचे टेंडर जाहीर झाले आहे. त्यामुळे आता या स्थानकांच्या विकास कामाला गती मिळणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगर रेल्वे स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विकासाची कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे या स्थानकांच्या पुनर्विकास करण्यासाठी सुमारे ९४७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, या निधीचा वापर अद्यापही होताना दिसून येत नाही. या १९ रेल्वे स्थानकांमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भांडूप, मुलूंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ आणि कसारा, असे एकूण ७ तर हार्बरवरील जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, अशा चार स्थानकांचा समावेश आहेत. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यासह एकूण ८ स्थानकांसह एकूण १९ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.
या १९ स्थानकांचा विकास सात टप्यात हाेणार आहे. पहिल्या टप्यात घाटकाेपर, विक्राेळी, भांडूप, दुसऱ्या टप्प्यात मुलूंड, डाेंबिवली, तिसऱ्या टप्यात नेरळ, कसारा त्यानंतर जीटीबी नगर, चेंबूर, गाेवंडी आणि मानखुर्द, पाचव्या टप्प्यात मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुझ, सहाव्या टप्यात कांदिवली, मिरा राेड आणि सातव्या टप्यात भाईंदर, वसई राेड, नालासाेपारा स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. ३६ महिन्यांत विकासाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.