यवतमाळ (Yavatmal) : वणी नगर परिषदमध्ये ई-टेंडरिंग (E Tendering) संबंधित खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपरिषदेत सुरू असलेल्या अधिकाऱ्यांची बोगस कारभार समोर आला आहे.
वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर सात कामांची वणी नगर परिषदेने ई-टेंडर (E Tender) प्रकाशित करून अवाजवी अटी लादून मर्जीतील ठेकेदार (Contractor) यांना लाभ मिळवून देण्यासाठी टेंडरचे सर्व नियम व अटी संबंधित अभियंत्याने धाब्यावर बसून हितसंबंध जोपासत कमीत कमी ठेकेदारांमध्ये स्पर्धा निर्माण करण्याची पूर्ण काळजी घेतली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केला आहे.
या प्रकारामुळे नगर परिषदेचे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास ही भरपाई ह्या संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल का करण्यात येवू नये, असा प्रश्नही दिलीप भोयर यांनी उपस्थित केला आहे.
बाकी सर्व कामे एक कोटीपेक्षा कमी किमतीचे असतानासुद्धा एवढ्या उच्च क्षमतेचे फक्त आर.एम.सी प्लांट मागवून इतर बाबी गौण ठेवून अटींचे व आवश्यक क्षमतेचे चुकीच्या पद्धतीचे गणन करून ठरलेले उद्दिष्ट राजकीय बाह्य शक्तीचा आधार घेत गाठण्याचा जोरदारपणे मुख्याधिकारी व संबंधित अभियंत्याकडून मुजोरीने प्रयत्न चालविल्या जात असल्याचा आरोप भोयर यांनी केला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देवून सखोल चौकशी करण्याची मागणीही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भोयर यांनी केली आहे.