Yavatmal News यवतमाळ : रोजगार हमी योजनेने प्रत्येकाला किमान रोजगार मिळवून देण्याची हमी घेतली आहे. याशिवाय रोजगार उपलब्ध नसेल तर, किमान वेतनाची रक्कम दिली जाणार होती. प्रत्यक्षात या बेरोजगार भत्त्यासाठी अनेकांनी आपल्या नावाची नोंदणी करून स्वतःचे जॉब कार्ड काढले. मजुरांचा हा आकडा दोन लाख 84 हजारांच्या घरात असतानाही मोठ्या प्रमाणात कामे वेटिंगवर आहेत, त्यामुळे बोगस मजूर नोंदणी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतींनी रोहयो मजुरांसाठी 36 हजार कामे उपलब्ध करून दिली आहेत. मजूर नसल्याने केवळ चार हजार 921 कामे सुरू आहेत. मजुरांची नोंदणीकृत संख्या मोठी असली तरी काम करणारे मजूर मात्र मोजकेच आहेत. घरकुल, रस्ते, विहिरी यासह विविध कामांच्या पूर्ततेसाठी मजूर नसल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात या कामांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
केवळ मानधनासाठी नोंद
रोजगार हमी योजनेत आधी रोजगार, रोजगार न मिळाल्यास 100 दिवसांच्या कामाची गॅरेटी सरकारने घेतली आहे. यात मानधनाचे प्रावधान आहे. यानुसार मजुरांना काम उपलब्ध करून ठेवले आहे. मात्र, या ठिकाणी अवघड काम असल्याने मजूर कानाडोळा करीत आहेत. अनेक मजूर खरे कामगार नसल्याने काम उपलब्ध होताच ते त्या ठिकाणावरून बाहेर पडले आहेत.
दोन लाख 84 हजार मजुरांची नोंदणी
जिल्ह्यात विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन लाख 84 हजार मजुरांनी आपली नोंद केली आहे. या मजुरांना गाव पातळीवरच्या योजना माहिती नाहीत. यामुळे अनेक योजनेला हे मजूर मुकले आहेत. या मजुरांच्या आकडेवारीनुसार ग्रामपंचायत विभागाने कामाचा अॅक्शन प्लॅन तयार केला. मात्र, मजूरच उपलब्ध झाले नाहीत.
रोहयोच्या 5 हजार कामांवर मजूर
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या चार हजार 121 कामांवर 49 हजार 730 मजूर उपलब्ध आहेत. या मजुरांच्या माध्यमातून गावामध्ये रस्त्यांचे काम सुरू आहे. काही ठिकाणी जलजीवन मिशनचे काम उपलब्ध आहेत, नाल्यांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. गत अनेक वर्षांपासून ही कामे थांबलेली आहेत.
रोहयोच्या योजनेवर कमी मजूर येण्याचे कारण काय?
रोहयो कामावर मजूर फिरकत नसल्याने या योजनेतील बहुतांश मजुरांची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हे मजूर बोगस मजूर आहेत. धनिकांच्या घरातील सधन व्यक्तींनी रोजगार हमी योजनेसाठी स्वतःची नोंद केली आहे. यामुळे हे मजूर कामे उपलब्ध झाले तरी कामावर येत नाहीत.
रोजगार हमी योजनेतील मजुरांची मजुरी वाढविण्यात आली आहे. 297 रुपयांची मजुरी मिळत आहे. मात्र मजूरवर्ग कुटुंबात मिळणारी ही मजुरी आणि कुटुंबाचा एकूण खर्च यात ताळमेळ बसत नाही. यातून मजूरबांधव या दरावर मजुरी करण्यास तयार नसल्याचेही याबाबत काहींनी सांगितले.