यवतमाळ (Yavatmal) : साडेचार वर्षे भांडणात आणि आणि एकमेकांच्या तक्रारीत गमावल्यानंतर यवतमाळ पालिकेने सहा कोटी रुपयांची विकासकामे काढली आहे. याकरिता टेंडर बोलावण्यात आल्या आहेत. कंत्राट कुणाला द्यायचे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले नाही तरच या कामाचे भवितव्य अवलंबून आहे.
यापूर्वी स्थानिक आमदार निधी, नगरोत्थान, दलितवस्ती, दलितेत्तर अशा विविध योजनाधून शहरात जवळपास ११ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. यानंतर पुन्हा पाच कोटी ७५ लाख रुपयांची कामे टेंडरला लागली आहेत. यात शहरातील अनेक प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण तसेच शासकीय कार्यालय, विश्रामभवनाचे विस्तारीकरण आदी कामांचा समावेश असून सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर प्रकाशित केले आहे.
यवतमाळ पालिकेत गेल्या पाच वर्षांपासून नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक असा थेट सामना सुरू आहे. त्यांचा परिणाम शहरातील अनेक विकास कामांवर झाला आहे. श्रेयवाद्यांच्या या लढाईत आतापर्यत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तापासून तर नगरविकास मंत्र्यांपर्यत झाल्या आहेत. त्यातून अनेक कामांची चौकशी सुरू आहे. विद्यमान नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचे जवळपास साडेचार वर्ष तक्रारी करण्यात गेले. त्यांचा विपरित परिणाम शहरातील कामांवर झाला. कचरा समस्येपासून फोडलेल्या रस्त्यांपर्यत अनेक अडचणी होत्या. असे असतानाही श्रेयवाद तसेच आरोप-प्रत्यारोपातच विद्यमान पालिका सभासदांचा कार्यकाळ संपला.
नगरसेवक पाच वर्षांपासून रस्ते, नालीच्या कामाबाबत ओरडत होते. त्यांच्या ओरडण्याला कार्यकाळ संपण्याच्या काही दिवसांपूर्वी न्याय मिळाला आहे. यवतमाळ पालिका क्षेत्रात जवळपास अकरा कोटींची रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. यात स्थानिक आमदार, खासदार निधीतुन पालिका क्षेत्रात ७४ कामे होणार आहे. यावर साडेतीन कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय, नगरोत्थान, दलित्तेत्तर, दलित वस्ती या तीन योजनेतून जवळपास ६० कामे होणार आहेत. दलित वस्ती योजनेच्या कामावर पाच कोटी तर नगरोत्थान, दलित्तेतर कामासाठी अडीच कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या निधीतील कामांना मंजुरी मिळाली असून कामे जवळपास संपली आहे. यानंतर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल पाच कोटी ७५ लाख रुपयांच्या निविदा प्रकाशित केल्या आहेत. यात शहरातील अनेक प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, खुल्या जागेचे सौदर्यीकरण यांचेसह काही शासकीय कार्यालय, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील कामांचा समावेश आहे.
दाते कॉलेज ते तीन फोटो चौक या एकाच रस्त्यांची कामे दोन विभागाने केली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने 215 मीटर रस्त्यांचे काम केले आहे. हे काम मे २०१९ मध्येच पूर्ण झाले. याच रस्त्यावर २१५ मीटरच्या पुढे ३७० मीटर लांब रस्त्यांचे काम रुंदीकरणासह करण्याबाबत नगरपालिकेने सप्टेंबर २०१९ मध्ये कंत्राटदराला आदेश दिले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेने केलेल्या कामांचे ४४ लक्ष रुपयांचे देयक काढणे हे म्हणणे संयुक्तिक नाही.
- मुकुंद कचरे, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग यवतमाळ