मोताळा (Motala) : येथील आठवडी बाजार चौकात रस्त्याच्या दुतर्फा नाल्याचे बांधकाम सुरू आहे. मागील आठवडाभरापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या खोदकाम करण्यात आल्या आहेत. बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने व्यवसायिकांसह नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मोताळा शहरात मागील सहा महिन्यांपासून फक्त रस्त्याच्या दुतर्फा नाल्याचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी नाल्यांची उंची कमी-जास्त होत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. मोताळा आठवडी बाजार चौकात मागील आठवड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांचे खोदकाम करण्यात आले. अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून नाल्यांसाठी वाट मोकळी करून दिली. परंतु संबंधित ठेकेदाराकडून नाल्या बांधकाम संथगतीने केले जात आहे. मोताळा येथे दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो. याठिकाणी व्यापारी व व्यवसायिकांसह नागरिकांची मोठी गर्दी उसळते. मात्र मुख्य चौकात रस्त्याच्या बाजूला नाल्याचे खोदकाम केलेले असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
काही व्यावसायिकांनी ग्राहकांना रस्ता ओलांडण्यासाठी नाल्यावर तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र दुकानात जाण्यासाठी रस्ता ओलांडताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना रस्ता ओलांडणे जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे त्यांना संबंधित दुकानाकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत आहे. आठवडी बाजार चौकात दोन्ही बाजूला मोठ्या नाल्या खोदल्या गेल्या आहेत. एका बाजूच्या नालीत काँक्रिट बेड टाकून लोखंडी सळ्या उभ्या केल्या आहेत. तर, दुसरीकडे अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यातच मागील तीन दिवसांपासून काम ठप्प पडल्याचे दिसत आहे. शहरातील मुख्य बाजार चौक असल्याने याठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत याठिकाणी नाल्यांचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्याची गरज आहे. मात्र संबंधित ठेकेदार संथगतीने काम करीत असल्याने व्यवसायिकांसह नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. व्यापारी व व्यावसायिकांच्या व्यवसायाला याचा मोठा फटका बसत आहे.