नागपूर (Nagpur) : सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्च केल्यानंतरही सक्करदरा तलाव आणि उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचे काम पुन्हा रखडले आहे. याकरिता एकूण २४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. १० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यापैकी साडेआठ कोटींचा निधी कंत्राटदाराला दिला आहे.
प्राप्त निधीमधून कंत्राटदाराने तलावाचे खोलीकरण केले. मात्र उर्वरित खर्चाला मान्यता मिळाली नसल्याने त्याने काम अर्धवट सोडून दिले आहे. सक्करदरा तलाव भोसलेकालीन आहे. नागपूर सुधार प्रन्यासने तलावच्या दर्शनी भागात असलेली झोपडपट्टी हटवून सौंदर्यीकरण केले होते. दर्शनी भागात उद्यानाची निर्मिती आणि मोठे सभागृह बांधण्यात आले होते. हॉटेल सेंटर पॉइंटच्या संचालकाला ते लीजवर चालवायला दिले होते. पाच वर्षानंतर हॉटेल सेंटरपॉइंट हॉटेलने फारसा बिजनेस होत नसल्याने ते सोडून दिले. दुसरीकडे तलावाच्या मधोमध असलेल्या उद्यानाचे कंत्राट एका नगरसेवकाने घेतले होते. काही वर्षे नियमित देखभाल होत होती. मात्र कंत्राट संपल्यानंतर तलावाची दुर्दशा झाली. तालवात गाळ साचला आहे. मूर्ती विसर्जन आणि निर्माल्यामुळे पाणी गढूळ झाले. उद्यानसुद्धा वाळले आहे. आता पुन्हा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे प्रयत्न केले जात आहे.
दक्षिण नागपुरातील नागरिकांच्या दृष्टीने हे ठिकाण अतिशय महत्त्वाचे आहे. या परिसरातील नागरिकांना मन रमविण्यासाठी सक्करदरा तलाव एक चांगला पर्याय म्हणून भविष्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत शासनाने प्रकल्पाला मंजुरी देखील दिली. महाराष्ट्र शासनाच्या निधीतून याचा विकास होणार आहे. सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरण व विकास कार्यासाठी नागपूर महापालिकेला २४ कोटी रुपये खर्चाची परवानगी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाली आहे. या अंतर्गत १० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ८.३५ कोटींचे कार्यादेश देण्यात आले होते. मात्र, शासनाकडून उर्वरित निधी प्राप्त न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून काम रखडले आहे. ‘स्ट्रीट फॉर पीपल’ या उपक्रमाच्या माध्यमातून आता या बाजारपेठेला नवे स्वरूप प्रदान करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
‘नागपूर स्मार्ट सिटी’तर्फे ‘स्ट्रीट फॉर पीपल’ अंतर्गत सक्करदरा तलाव स्ट्रीटची निवड करण्यात आली आहे. सक्करदरा तलावाचा संपूर्ण परिसर ७.८० हेक्टर असून तलाव ३.६८ हेक्टर भागामध्ये आहे. मनपातर्फे लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान, अँम्पी थिएटर, फूड कोर्ट, उद्यानाचा विकास आणि उद्यानाचा विकास करणे प्रस्तावित आहे. जाखापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनी तलावाचा विकास करीत आहे.