नागपूर (Nagpur) : गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी नाही. नासुप्रच्या मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. परंतु काटेकोरपणे नियमाचे पालन करीत जीएसटीचा भरणा तसेच संबंधित कागदपत्राची पूर्तता केल्यामुळे केंद्रीय वित्त मंत्रालयाने महापालिकेची कौतुकाने पाठ थोपटली असून प्रशस्तीपत्र दिले.
महापालिकेत विविध साहित्य खरेदीसह टॅक्स वसुलीही करते. त्यामुळे महापालिकाही दरवर्षी कोट्यवधीचा जीएसटी अदा करते. अर्थात यासाठी महापालिकेने एस. कुलकर्णी असोसिएट्स या कंपनीकडून जीएसटीसंबंधीची कामे केली जातात. २०२१-२२ या वर्षात महापालिकेने नियमित जीएसटी व कागदपत्राची पूर्तता जीएसटी विभागाला केली. अगदी नियमाचे काटेकोरपणे पालक करीत महापालिकेने वर्षभरात जीएसटी विभागावर छाप पाडली. महापालिकेच्या या कार्याची दखल केंद्रीय वित्त विभागाने घेतली. नियमितपणे जीएसटी संबंधी रिटर्न तसेच रकमेचा भरणा केल्याबाबत केंद्रीय वित्त विभागाने महापालिकेला प्रशस्तीपत्र बहाल करीत स्तुती केली.
महापालिकेने राष्ट्रबांधणीच्या कामात योगदान दिल्याचे प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले. एस. कुलकर्णी असोसिएट्सच्या आरती कुलकर्णी यांनी आज महापालिका आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्याकडे प्रशस्तीपत्र सुपूर्द केले. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी नाही. ३१ डिसेंबरला वित्त व लेखा अधिकारी विजय कोल्हे निवृत्त झाले. गेल्या सहा महिन्यांपासून नासुप्रच्या वित्त व लेखा अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. अनेकांचे देयके त्यामुळे थकली आहेत. कंत्राटदार वित्त अधिकारी नेमा आणि आमचे बिल काढा अशी मागणी करती आहेत.