नागपूर (Nagpur) : कोराडी महाऔष्णिक वीज केंद्राचा (Koradi Thermal Power Plant) फुटललेल्या ६६ कोटींच्या राख बंधाऱ्याला (Fly Ash) शनिवारी माजी पर्यावरणमंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) भेट देणार आहेत. शनिवारी ते नागपूरला येत आहे. मंत्री असताना ठाकरे यांनी या बंधाऱ्याची चौकशी लावली होती. हा राख बंधारा चार वर्षांत फुटला परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमिन प्रदूषित झाली. मात्र महानिर्मिती (Mahadiscom) कंपनीचे अधिकारी संबंधिक ठेकेदाराला वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. याकरिता आपल्याच दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे.
या राख बंधाऱ्यातून कन्हान नदीत राख सोडली जात होती. नदी प्रदूषित होत असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार एक अहवाल आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केला होता. महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी यापुढे कन्हान नदीत राख सोडली जाणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांना दिले होते.
आता राज्यातील सत्ता बदलली आहे. त्यानंतर हा बंधारा फुटला. सुरवातीला महानिर्मिती कंपनीने बंधारा ओव्हर फ्लो झाल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंधारा फुटल्याचे व्हीडीओ समोर आल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांनी ते मान्य केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेतली. जिल्हाधिकारी यांना सर्व माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी महानिर्मिती कंपनीला कारणमीमांसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यात बंधारा फुटलल्याचे थातूरमातूर कारण देण्यात आले आहे.
आता आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या ६६० मेगावॅटच्या तीन विस्तारित प्रकल्पासाठी खसाळा गावात राख बंधारा बांधण्यासाठी ५ ऑक्टोबर २०१८ ला ६६ कोटी २२ लाखांचे कंत्राट अभि इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन कंपनीला देण्यात आले होते.