नागपूर (Nagpur) : राज्य परिवहन विभागाच्या बसमधील छापील तिकिटांची जागा इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनने घेतल्याने वाहकाचे काम अधिक सूलभ होण्याऐवजी त्याचाच्या अडचणीत भरच पडली आहे. ठिकाण टाकताच तिकीट मशीनमधून बाहेर निघते. त्यामुळे छापील तिकीटे हद्दपार झाली. मात्र, आता या मशीनच कालबाह्य झाल्याने तांत्रिक बिघाड होऊ लागले आहेत. त्याचा त्रास वाहकांसोबत प्रवाशांना होत असून, त्यामुळे वादही होत आहेत. परिणामी एसटी प्रशासनाकडून 'जूनं ते सोनं' म्हणत ट्रे-तिकिटाचा पर्यायही दिला जात आहे.
लॉकडाउन आणि एसटी कामगाराच्या संपामुळे मशिनचा वापर पूर्णपणे बंद होता. संपानंतर आता एसटी पूर्वपदावर आली. मात्र, जवळपास ५० टक्के मशिनचा तुटवडा आहे. कामावर अचानक मशिन बंद पडत असल्याने वाहकासोबतच प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. 'बालाजी ट्रायमेक्स'च्या ईटीआय मशीन एसटीच्या वापरात आहेत. त्या दोन वर्षांपूर्वीच कालबाह्य झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यात नेहमीच बिघाड होत असून, कामावर त्या बंद पडत असल्याने वाहकासोबतच प्रवाशांनाही मनस्ताप होत आहे.
संपाचा मशीनलाही फटका
कोरोनामुळे गाड्या बंद होत्या. त्यानंतर एसटी कामगारांचा संप पाच महिने चालला. संपकाळात मशीन बंद अवस्थेत होत्या. आता लॉकडाउन संपला असून, संप ही मिटला आहे. त्यामुळे गाड्या पूर्वीसारख्या धावू लागल्या आहेत, बस स्थानके प्रवाशांनी हाऊसफुल्ल दिसत आहेत. मशीनचा तुटवडा असल्याने त्या वाहकांना फारशा उपलब्ध नाहीत. तसेच, या मशीन ऐनवेळी बंद पडत असल्याने वाहकांना मशीन सोबतच छापील तिकीटांचा ‘ट्रे’ सुद्धा जवळ बाळगावा लागतो आहे. मशीन बंद पडल्यास कारवाईला सामोरे जाण्याची भिती वाहकांना सतावते आहे.
नागपूर विभागात मशीनची स्थिती
एकूण मशीन : १०९८
सुरू : ५७४
बंद : ५२४
दुरुस्तीला : ४००
एकूण वाहक : ८११
दरदिवशी कामगिरीवर वाहक : ७००
ईटीआय मशीनच्या विविध समस्या आहेत. कागद निघतो पण प्रिंट निघत नाही. चार्जिंगची सर्वांत मोठी समस्या आहे. मशीन सुरू व्हायलाही बराच वेळ लागतो. मशिन बंद पडली, त्याचवेळी तपासणी पथक धडकले, तर कारवाईत अडकण्याची भीती वाहकांना असते.
- वाहक, एसटी
विदर्भ विभागातील मशीनची अडचण त्वरित दूर केली जाईल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक