वर्धा (Wardha) : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा येथील शासकीय विश्रामगृह, गांधी हेरिटेज म्हणून विकसित करण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. आमदार भोयर यांच्या पाठपुराव्यामुळे सेवाग्राम विकास आराखड्याला मागील कालावधीत पालकमंत्री असताना, मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता.
आता पुन्हा पालकमंत्र्यांनी विश्रामगृह हेरिटेज विकसित करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉ. भोयर यांनी केली. त्यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा आराखडा तयार करा, एक चांगली डिझाइन तयार करून त्याचे सादरीकरण करा. त्यासाठी वास्तुविशारद शाखेतील विद्यार्थ्यांची स्पर्धा घ्या. त्यांना बक्षिसे द्या. तेच उत्तम आराखडा तयार करून देईल, अशी सूचना त्यांनी केली. बक्षिसाची रक्कम सीआरएस फंडातून दिली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.