वर्धा (Wardha) : हिवाळी अधिवेशनात हिंगणघाटात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर करून जागेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेत स्थानिक उपजिल्हा रुग्णालय परिसरात उपलब्ध एकूण 40.80 एकर मोकळ्या असलेल्या जागेची माहिती दिली.
हिंगणघाट येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला 400 खाटांसाठी मंजुरी मिळाली आहे. शहराच्या मध्यभागी तुकडोजी वॉर्डातील या रुग्णालयासमोर नागपूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग, तर जवळच रेल्वे स्थानक आहे. याच 16 एकर जमीन परिसरातील 1 एकर जागा एका संस्थेला दिली आहे. 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय 400 खाटांसाठी मंजुरी मिळाली असून, याच परिसरात लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
याच रुग्णालयालगत जवळपास 25.08 एकर जमीन महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी लागणारी आवश्यक रुग्ण संख्या, एकाच ठिकाणी जागा सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासनाने या उपलब्ध जागेची दखल घेऊन सकारात्मक पावले उचलावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील जागेची माहिती देऊन सातबारा जिल्हाधिकारी वर्धा यांना सादर करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सुनील पिंपळकर, सुरेंद्र टेंभुर्णे, जगदीश वांदिले, सुनील राऊत, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, अतुल वांदिले, पंढरीनाथ कापसे, सतीश धोबे, अमित रंगारी, दीपाली रंगारी, सुजाता जांभुळकर आदी उपस्थित होते.