वर्धा (Wardha) : वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा क्षेत्रात आहे, तर अर्धा मोर्शी विधानसभा क्षेत्रात आहे. मागील 33 वर्षांपासून अप्पर वर्धा धरण असलेल्या पर्यटनस्थळाला न्याय देण्यासाठी तयार प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून आहे. सरकारस्तरावर कुठलीही दखल घेतली नसून, लोकप्रतिनिधीही मूग गिळून आहे. परिणामी, वर्धा आणि अमरावती तसेच आर्वी व मोर्शी येथील पर्यटकांमध्ये नाराजी आहे.
या उद्यानाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्र्यांनी 1992 पूर्वी आराखडा तयार केला होता. त्यावेळीपासून अद्यापही कोणत्याही मंत्र्यांनी पुढाकार घेऊन याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे 1992 पूर्वीचा आराखडा जशाच्या तसाच मंत्रालयात धूळखात पडून आहे.
उद्यानासाठी प्रकल्पाच्या उजव्या बाजूला 45.79 हेक्टर जमीन व डाव्या बाजूला 38.88 हेक्टर जमीन प्रस्तावित होती. दोन्हीपैकी एका जागेवर मोठे उद्यान निर्माण होणार होते. 1991 मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा असलेला अप्पर वर्धा न धरणग्रस्त स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती.
त्यानंतर याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींनी प्रश्नही उपस्थित केले. मात्र पर्यटनस्थळाबद्दल काही विशेष हालचाली झाल्या नाही. जो आराखडा तयार केला, त्यात सौंदर्गीकरण करण्याचा उल्लेख होता. मात्र, उद्यान योजना धूळखात पडून आहे. लोकसभेच्या प्रचारातही हा मुद्दा नाही.
विकास आराखड्यात अशा होत्या सुविधा
उद्यान योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये बालोद्यान, धबधबे, वसतिगृह, उपाहारगृहे, व्यावसायिक प्रतिष्ठाने, लाभहट मॉडेल्स, तंबू वसाहत, रस्ते, पायवाट, प्राणी व पक्षी मत्स्यसंग्रहालये, रोपटे, पवनचक्की, जलक्रीडा अंतर्गत वॉटर पार्क निसर्गोपचार केंद्र, योग केंद्र तसेच पोलिस चौकी प्रस्तावित होती.
त्यासाठी 1990-91 मध्ये एकूण 8 प्रस्ताव प्राप्त झाले होते. ऑगस्ट 1992 नंतर तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांनी अप्पर वर्धा धरणाजवळील तीरावरील प्रस्तावित उद्यानाच्या जागेची पाहणीही केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील खासगी वास्तुशास्त्रज्ञ व डिझायनर उपस्थित होते. सर्वांची वरिष्ठ अधिकाऱ्यासह धरणाच्या विश्रामगृहात बैठक पार पडली होती, हे विशेष.
राज्य शासनाने विकासाकडे लक्ष देणे गरजेचे
सद्यःस्थितीत विदर्भाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी नवनवीन प्रकल्प विदर्भात येत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह राज्य शासनाने आवर्जून लक्ष दिल्यास 33 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव निकाली निघू शकतो, अशी अपेक्षा आहे. प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करणे गरजेचे आहे.
विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. अमरावती, वर्धा पर्यटनस्थळाची खाण असून, अध्यापन व्यवसायाला चालना देण्यासाठी मध्यप्रदेशातील मोठमोठ्या व्यावसायिकांकडून प्रस्ताव आमंत्रित आहे.
अप्पर वर्धा पर्यटनस्थळाबाबत महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात दीड महिन्यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत पाठपुरावा करणे सुरू आहे. अप्पर वर्धा पर्यटनस्थळाबाबत संपूर्ण माहिती पाठवली असून प्रस्ताव मंत्रालयातून मंजूर झाल्यानंतर व निधी उपलब्ध झाल्यावर पर्यटनस्थळाचे काम सुरू होईल, अशी माहिती अप्पर वर्धा प्रकल्पचे कार्यकारी अभियंता, अमित सावंत यांनी दिली.