नागपूर (Nagpur) : शहरात अडीचशेवर इमारती धोकादायक असून, त्यात हजारांवर नागरिकांचे वास्तव्य आहे. परंतु महापालिकेकडून दरवर्षी केवळ नोटीस देण्याची औपचारिकता पूर्ण केली जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात पाऊस असून, एखादी धोकादायक इमारत कोसळून मोठी जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. (Nagpur Municipal Corporation)
अजनी परिसरातील घराची भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात शहरात २८७ धोकादायक इमारती असल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारती रिकाम्या करून त्या पाडण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले होते. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटीस बजावून काही बोटावर मोजण्याइतक्या इमारतींवर कारवाई करण्यात आली. परंतु, अजूनही अडीचशेवर धोकादायक इमारती कायम आहे. विशेष म्हणजे, यात अतिधोकादायक व तात्काळ निष्कासित करावयाच्या ९७ इमारती आढळल्या आहेत. परंतु, दरवर्षीप्रमाणे नोटीस कारवाई केली जाते. कधी भाडेकरू व घरमालक यांच्यातील वाद कोर्टात सुरू असल्याच्या कारणावरून या इमारतींकडे दुर्लक्ष केले जाते तर कधी मानवीय विचार करून दुर्लक्ष केले जाते.
गेल्या आठ दिवसांपासून शहरात दररोज जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागांत पाणी साचले आहे. या पावसाचा मारा सहन करण्याची क्षमताही या इमारतीत नाही. त्यामुळे या इमारतीतील हजारांवर नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुळात पावसाळ्यापूर्वीच महापालिकेकडून या इमारतींवर कारवाई करणे अपेक्षित असते. परंतु अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करून केवळ दुकाने हटविण्यावरच भर देत आहे. मुळात अतिक्रमण हटविणे व ते पुन्हा परत करणे यातून महापालिकेला महसूल, तर अधिकारी, कर्मचाऱ्यांना मलिदा मिळत असल्याने धोकादायक, जीर्ण घरांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक जीर्ण इमारती गांधीबाग झोनमध्ये
सर्वाधिक ९६ जीर्ण इमारती गांधीबाग झोनमध्ये आहेत. त्यापाठोपाठ मंगळवारीमध्ये ५०, धंतोलीमधील ४९ आणि लक्ष्मीनगरातील ४६ इमारतींचा समावेश आहे. काही ठिकाणी शिकस्त इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी असूनही, कारवाई होत नसल्याची माहिती आहे. आसीनगर झोनमध्ये असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.