Bhandara News भंडारा : अमृत भारत योजने अंतर्गत देशात रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या तुमसर रोड रेल्वे जंक्शन या रेल्वे स्थानकाचा सुद्धा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 8 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी खर्च करून काम सुरू आहे. परंतु तीन महिन्यांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे.
पहिल्या टप्यात येथे रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार व निर्गमनद्वार बनविले जात आहे. हे द्वार आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. अमृत भारत योजने अंतर्गत देशातील रेल्वे स्टेशन स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवासी अनुकूल बनविले जात आहे. या स्टेशनचे काम 26 फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेचा शुभारंभ केला होता.
तुमसर रेल्वे स्टेशन कामा संदर्भात
गतिशक्त्ती विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर, मुख्य परियोजना प्रबंधक, ए. के. सूर्यवंशी यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अमृत भारत योजनेअंतर्गत तुमसर रेल्वे स्टेशनमध्ये विविध कामे रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार व टेंडरनुसार सुरू आहेत. दिलेल्या वेळेत ती कामे नक्कीच पूर्ण केली जातील. आम्हाला याबाबत माहिती देता येत नाही.
कोणत्या सुविधा मिळणार
अमृत भारत योजनेअंतर्गत या स्टेशनमध्ये बारा मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. कचरा व्यवस्थापन, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हाय मास्ट लाईट बसविले जाणार आहेत. सोबतच येथील रेल्वे स्टेशन मध्ये लिफ्ट देखील बसवली जाणार आहे. रेल्वेच्या वेळा दर्शविण्यासाठी आधुनिक डिजिटल बोर्ड तसेच तिकीट घरांचा विकास करण्यात येईल, हा विकास करताना दिव्यांगांचा देखील विचार केला जाणार आहे.
ही कामे आहेत सुरू
तुमसर रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश व निर्गमन द्वार, एसीपी, पोर्च, पार्किंग टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, बी. बी. एस. मॉडेल प्रसाधनगृह, अतिरिक्त सीओपी, सीसीटीव्ही कॅमेरे, लिफ्ट दोन, कोच व ट्रेन इंडिकेशन बोर्ड, सिलिंग वॉल पॅनलिंग, प्रथम व दुसरा दर्जा प्रतीक्षालय इत्यादी कामे केली जात आहे.