नागपूर (Nagpur) : अनेक वर्षांपासून नागरिकांची डोकेदुखी ठरत असलेल्या अमरावती-अकोला ७५ किलोमीटररचा महामार्ग अवघ्या १०८ तासांत पूर्ण केला जाणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सुपरफास्ट कंत्राटदार शोधला असून राजपथ इन्फ्रा कंपनीला या रस्त्याचे काम देण्यात आले आहे.
अमरावती-अकोला महामार्गाचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. यापूर्वीचा कंत्राटदार पळून गेला. तेव्हापासून या रस्त्याचे काम हाती घेण्यास कोणीच तयार नव्हते. मोठमोठे आणि जीवघेणे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे अनेकांनी मार्गच बदलाव आहे. अकोल्याला जाण्यासाठी अलीकडे दर्यापूर मार्गाने जाणे वाहनचालक पसंत करतात. या रस्त्याचा वाद उच्च न्यायालयातही पोहचला होता. त्यामुळे गडकरी यांना दिलगिरीसुद्धा व्यक्त करावी लागली होती.
अमरावती बायपासनंतर लोणी गावाजवळून मूर्तीजापूरच्या आधीपर्यंतच्या चौपदरी मार्गावर हे ‘वेगवान’ काम होणार आहे. ५४ किलोमीटर लांबीपैकी एका बाजूच्या दोन लेनमधून ७५ किलोमीटरचे बांधकाम केले जाणार आहे. शुक्रवार, ३ जून रोजीपासून कामास प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पाचे काम सलग पाच दिवस अहोरात्र चालणार आहे. राजपथ इन्फ्रा कंपनीने यापूर्वी सांगली-सातारा या भागात २४ तासांत ३९ किलोमीटरचा रस्ता बांधला होता. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.