नागपूर (Nagpur) : सिटी सर्व्हे (Land Records), नागपूरच्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या चल-अचल मालमत्तेची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशानंतर शहरात कार्यरत असलेल्या सिटी सर्व्हेच्या तीनही कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नागपूर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सिटी सर्व्हेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चल-अचल मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाने एसएलआर (अधीक्षक) यांना दिले आहे. त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. एसएलआरचा अहवाल दिल्यानंतरच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वाडी पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सुनील बन, त्यांचे सहकारी पवन केवटे आणि उज्वला तेलंग यांच्याविरुद्ध एका नागरिकाच्या मृत्यूनंतर त्याची जमीन विकून बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध भूमी अभिलेख उपसंचालकांकडूनही तपास सुरू आहे. सुनील बन यांची नुकतीच नागपूरहून वर्धा येथे बदली झाली आहे.
सिटी सर्व्हे क्र. 1 मध्ये भूमापन अधिकाऱ्यासह सुमारे 30 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेवढेच अधिकारी व कर्मचारी अनुक्रमे सिटी सर्व्हे क्र. 2 आणि 3 मध्ये आहेत. अशाप्रकारे सुमारे 900 कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या चल-अचल मालमत्तेची तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाचे अधीक्षक अनिल नेमा म्हणाले की, तक्रारींची दखल घेत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या आगोदर शेकडो फेरफार प्रकरणे प्रलंबित असल्याचे समोर आले. त्याच्या आधारे नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या मानवाधिकार सेलचे शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ उके यांनी सिटी सर्व्हेमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली.
असे समोर आले प्रकरण...
सिव्हिल लाईन्स येथील सिटी सर्व्हे कार्यालयातील भूमापन कार्यालय-3 चे संवर्धन भूमापन अधिकारी प्रकाश बाळकृष्ण निदेंकर (46) याला एसीबीच्या पथकाने 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तेव्हापासूनच या प्रकारणाचा तपास सुरू होता.
बेहिशेबी संपत्ती असल्याचा संशय
सिटी सर्व्हेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चल-अचल मालमत्तेची तपासणी करण्याच्या आदेशाची शहरात जोरदार चर्चा आहे. हे अधिकारी व कर्मचारी बेहिशेबी संपत्तीचे मालक असल्याचे बोलले जात आहे. जाणकारांच्या मते, या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केवळ लाचखोरीच केली जात नाही, तर जमीन घोटाळ्याच्या मोठ्या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची लूट केली जाते. सिटी सर्व्हेची तिन्ही कार्यालये सिव्हिल लाईन्समध्ये एकाच आवारात असून, जवळच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेही कार्यालय आहे, हे विशेष. म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाकाखाली बराच काळ भ्रष्टाचार फोफावत आहे.