नागपूर (Nagpur) : कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राख बांध फुटीच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळने (एमपीसीबी) महानिर्मितीला दणका देत १२ लाखांची बॅंक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने २५ लाखांची बॅंक गॅरंटी भरण्याचे आदेश दिले.
कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा शनिवारी सकाळी फुटला. यातील लाखो टन राख वाहून गेली आहे. ही राख मिश्रित पाणी खसाळा, मसाळा, खैरी गावातून परिसरातील नदी, नाल्यात गेली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातही राख गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. खसाळा राख बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी विशिष्ट पाइपलाइनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु या पाइपलाइनचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या बंधाऱ्याचे देखभाल दुरुस्तीचे काम अभी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी वारंवार संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली होती. कामाचा दर्जा पाहून हा बंधारा फुटेल अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. मात्र संबंधित कंत्राटदार, अधिकाऱ्यांना या घटनेचा अंदाज का आला नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एमपीसीबीच्या पथकाने घटना स्थळाची पाहणी केली. प्रकल्पाच्या उभारणीच्या वेळ पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या वेळी घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन महानिर्मितीने केल असून, तलावी उंची मंजूर क्षमतेपेक्षा अधिक केल्याचे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.
कोराडी औष्णिक वीज केंद्र तयार करताना पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी महानिर्मितीची १२ लाख रुपयांची बॅंक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे. २५ लाख रुपये त्यांना नव्याने द्यायचे आहे.
- अशोक करे, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी