वर्धा (Wardha) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली तरी अंधाराचे साम्राज्य होते. अखेर पाच महिन्यांनंतर हा उड्डाणपूल पथदिव्यांनी उजाळला.
यंदा 17 जूनपासून उड्डाणपुलावर वाहतूक सुरू झाली. तथापि, उड्डाणपूल व सर्व्हिस रोडवर पाच महिन्यांपासून खांब उभारले असतानासुद्धा जांडू कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दिरंगाईमुळे त्यावरील पथदिवे मात्र बंद होते. स्थानिक समस्या संघर्ष समिती व विविध सामाजिक संघटनांनी या समस्येबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सातत्याने लक्ष वेधले. दिवाळीपूर्वी उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू व्हावे, असा आग्रह धरला. अखेर दिवाळीपूर्वी पथदिवे सुरू झाल्याने उड्डाणपुलाचा संपूर्ण परिसर व बाजूचे रस्ते प्रकाशमान झाले. रात्री येथून ये- जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पथदिवे सुरु झाल्याने सर्व परिसर प्रकाशमय झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे. उड्डाणपुलावर पथदिवे नसल्यामुळे अनेक दुर्घटना या पुलावर झाल्या. त्यामुळे स्थानीय नागरिकांनी पथदिवे सुरु करण्याची मागणी धरली होती. पण ठेकेदार च्या दिरंगाईमुळे हे काम अनेक महिन्यापासून प्रलंबित होते.
संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा :
संघर्ष समितीने यापुढे उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीची अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे व्यक्त केली आहे. तसे न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता महामार्ग प्रधिकरणच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.