नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्हा परिषदेतील (Nagpur ZP) लघुसिंचन विभागात अजब कारभार सुरू आहे. येथे कामात अनियमित झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता कामेच होत नसल्याचे दिसते आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर निधीचे कामे वर्षभरानंतरही झाले नाही. टेंडर काढली, परंतु ती खुली करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी सर्वकाही व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे पावसाळ्यात तलावांची कामे करणार का, असाच सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वर्ष २०२१-२२ करता सात कोटींचा निधी मिळाला. त्या प्रमाणे खनिज निधीतून साडे तीन कोटींचा निधी मिळाला. या ११ कोटींच्या निधीतून तलावांचे खोलीकरण, दुरुस्तीसह इतर कामे करण्यात येणार आहेत. लघुसिंचन विभागाचे तलाव मासेमारीसाठीही लीजवर देण्यात येतात. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांनाही याचा फायदा होतो. मागील आर्थिक वर्षात हा निधी खर्च होणे अपेक्षित होते. परंतु संपूर्ण वर्षात एकही रुपया खर्च केला नाही. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतरही टेंडर जारी करण्यात आल्या नाही.
आता ११ कोटींच्या ७४ कामांसाठी टेंडर काढण्यात आल्या. परंतु त्या खुल्या करण्यात आल्या नाही. मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी विभागातील काही जणांकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळेच या कामासाठी विलंब होत असल्याची चर्चा आहे. विशिष्ट कंत्राटदरासाठी कामे रोखण्यात आली. यापूर्वी याच विभागात सुरक्षा ठेव घोटाळा झाल्याचे समोर आले असून १२ कंत्राटदारांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. परंतु विभागाचे कंत्राटदारांवरचे प्रेम कमी होताना दिसत नाही.
जवळपास ११ कोटींची ७४ कामे आहेत. यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. प्रशासकीय काम पूर्ण झाल्यावर त्या खुल्या करण्यात येतील.
- बंडू सयाम, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन विभाग, जि.प.