नागपूर (Nagpur) : नागपूर शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सीताबर्डीतील व्यावसायिकांना आता ग्लोकल मॉलचे फटके बसण्यास सुरवात झाली आहे. सुमारे पाच दशकांपासून येथे व्यवसाय करणारे न्यायालयात पराभूत झाल्याने त्यांची ३३ दुकाने एका झटक्यात पाडण्यात आली.
सीताबर्डीत ग्लोकल मॉल उभारण्यात येत असून, त्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्याच्या दर्शनी भागात अनेकांची दुकाने होती. त्यांनी मॉलसाठी दुकाने हटविण्यास नकार दिला होता. सुमारे चार वर्षांपासून त्याकरिता ते न्यायालयात लढा देत होते. येथील सर्व दुकानदार भाडेकरू आहेत. मात्र मालकानेच जागा विकल्याने त्यांचा नाईलजा झाला. न्यायालयाने दुकानदारांची याचिका फेटाळून लावताच नागपूर सुधार प्रन्यासचे बुलडोझर येथे धडकले. यात जवळपास ३३ दुकाने भूईसपाट करण्यात आली.
सीताबर्डी येथे ग्लोकल मॉल तयार करण्यात येत आहे. ही सर्व जागा बुटी यांची आहे. येथील दुकानदार यापूर्वीही न्यायालयात गेले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सीताबर्डी मेन रोडवर अनेकांंनी पक्के बांधकाम करून दुकाने थाटले होते. 'नासुप्र'च्या कारवाईविरोधात येथील दुकानदार १ तारखेलाही न्यायालयात गेले होते. परंतु न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही.
सोमवारी सकाळी 'नासुप्र'चे पथक दुकाने तोडण्यासाठी आले. त्यावेळी दुकानदारांनी विरोध करण्याच्या प्रयत्न केला. मात्र मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. चार जेसीपीच्या सहाय्याने येथील दुकाने तोडण्यास सुरवात करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. अवघ्या तीन तासांत येथील दुकाने तोडल्यानंतर अभ्यंकर रोडवरील अतिक्रमण तोडण्यात आले. त्यामुळे सर्वत्र पत्र्याचे शेड, तुटलेल्या भिंतीचा मलबा पडला होता.
सीताबर्डीचा बदलला 'लूक'
'नासुप्र'च्या कारवाईमुळे सीताबर्डी मुख्य रस्ता आता रुंद झाला असून, ग्लोकल मॉल दिसून येत आहे. मेट्रो रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या या मॉलमुळे सीताबर्डीचे चित्र बदलणार आहे, तर कारवाईमुळे मुख्य रस्त्याचा 'लूक'ही बदलला आहे.