नागपूर (Nagpur) : दोन वर्षांहून अधिक कालावधीपासून रखडलेल्या सावनेर तालुक्यातील चिचोली खापरखेडा येथे तयार करण्यात येणाऱ्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पा (सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट, एसटीपी) निर्मितीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार एसटीपीसाठी सर्वेक्षणही झाले. परंतु आता निधी नसल्याने पुन्हा हा प्रकल्प रखडला आहे.
चिचोली येथील 0.99 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजित केले आहे. जिल्हा परिषदेकडून वारंवार नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) पाठविल्यानंतरही त्यांच्याकडून निधीच उपलब्ध झालेला नाही. परंतु आता या एसटीपीसाठी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी पुढाकार घेतला आहे. नांदेडच्या धर्तीवर 'डिसेंट्रलाईज्ड वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लांट' उभारण्याचे नियोजन त्यांनी आखले. त्यानुसार नांदेड येथील एका एजन्सीकडून यासंदर्भात चिचोलीतील एसटीपी उभारण्यात येणाऱ्या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार सुमारे 2.50 कोटीच्या घरात या प्रकल्पाचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी निधीची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न होणार आहेत. माहितीनुसार जि. प. च्या पाणी व स्वच्छता मिशन वे विभागाकडे 1 कोटीचा निधी आहे. तर उर्वरित निधी खनिज प्रतिष्ठानमधून मिळण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर प्रयत्न होत आहे.
आदेशाकडे दुर्लक्ष
चिचोली खापरखेडा व पोटा चनकापूर या ग्रामपंचायतींचे लाखो लिटर सांडपाणी लगतच्या कोलार नदीला जाऊन मिळते. यामुळे नदी प्रदूषित होत आहे. या सांडपाण्याला रोखण्यासाठी तेथे एसटीपी निर्माण करून नदीत जाणाऱ्या घाण व सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करावी अन्यथा महिन्याला पाच ते दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) जून 2020 मध्येच जि.प. ला दिले होते. परंतु अद्याप एसटीपी तयार झाला नाही.