नागपूर (Nagpur) : शहराला आकार देऊन नियोजनबद्ध विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला. परंतु गेल्या दोन दशकांपासून शहरातील नागरिकांच्या सुसह्य प्रवासासाठी प्रस्तावित करण्यात आलेले विकास आराखड्यातील रस्ते अद्यापही अपूर्णच आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे अनेक प्रस्तावित रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने नवी डोकेदुखी वाढली. आता नागरिकच रस्त्यांच्या कामाला विरोध करीत असल्याने विकास आराखड्यातील रस्त्यांबाबत शंका निर्माण झाली आहे.
शहराचा विकास आराखडा तयार करताना नगर रचना विभाग पुढील २० ते २५ वर्षांची गरज लक्षात घेऊन नियोजन करीत असतो. यात रस्त्यांचाही समावेश असतो. त्यानुसार २००१ च्या नागपूर शहर आराखड्यात ३९० रस्त्यांचे नियोजन केले होते. त्यातील जुना भंडारा रोड, पिवळी मारबत यासह अनेक रस्त्यांची कामे अजून होऊ शकलेली नाहीत. जुना भंडारा रोडचे काम रखडले. तत्कालीन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज हा रस्ता भविष्यात होईल, असे चित्र नाही. या रस्त्यासाठी न्यायालयातही धाव घेतली. केळीबाग रस्त्यांचे काम सुरू झाले. परंतु कधी जागा अधिग्रहण तर कधी नागरिकांचा विरोध, न्यायालय आदीमुळे हा रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे या रस्त्यांचे काम सुरू झाले. मात्र, महापालिका प्रशासनाकडून मंदगतीने काम सुरू आहे. पिवळी मारबत रस्ता अद्याप ‘जैसे थे’ स्थितीत आहे. भविष्यात हा रस्ता होईल, याबाबतही शंका आहे. जुना भंडारा रोडवरील दुकाने रस्त्यापर्यंत आली आहे. अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला. नागरिकांना या रस्त्यावरून येजा करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही रस्त्यांचा डीपीआर तयार करताना तांत्रिक बाबी लक्षात घेण्यात आला नसल्याचे ग्रेट नाग रोडवरून दिसून येते. हा रस्ता सिमेंटचा करण्याचा डीपीआर तयार करण्यात आला. परंतु या रस्त्याखालून असलेल्या जलवाहिन्यांचा विचार करण्यात आला नाही. आता सिमेंट रस्ता तयार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा चौक ते रेशीमबाग चौकापर्यंतचा रस्ता सिमेंट रस्त्यात आहे. सिमेंटीकरणाची प्रतीक्षा करीत या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यातून नागरिकांना पाठदुखी, स्पॉंडिलायटिससारखे आजार मिळत आहे. गेल्या काही वर्षात सिव्हिल लाईनसारख्या भागातील रस्ते तयार करण्यात भर देण्यात आला. मॉरिस कॉलेज टी पाईंट- विज्ञान संस्था या दरम्यान रस्ता तयार झाला आहे. उत्तर अंबाझरी मार्ग-मातृसेवा संघ, महाराजबाग चौक ते विद्यापीठ ग्रंथालय हे रस्ते पूर्ण करण्यात आले. परंतु पूर्व नागपुराकडील जुना भंडारा रोड, पिवळी मारबत रस्त्याबाबत अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली नाही. त्यामुळे दोन दशकानंतरही हे रस्ते अपूर्ण असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.