नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील बहुसंख्य विहिरी जीर्ण सिवेज लाईनमधील सांडपाण्याच्या गळतीने दूषित झाल्या आहेत. जीर्ण सिवेज लाईनची समस्या दूर करण्याऐवजी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत विहिरींवर नऊ कोटी रुपये खर्च केले. परंतु अजूनही सांडपाणी गळतीमुळे विहिरी दूषितच असून, नऊ कोटींचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. जीर्ण सिवेज लाईनच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून विहिरींवरील खर्च म्हणजे ‘डोक्याला आजार, पायाला मलमपट्टी’, अशी टीका होत आहे. (Nagpur City News)
तीन वर्षांपूर्वी जलसंकटामुळे महापालिकेवर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे महापालिकेने विहिरी, बोअरवेल दुरुस्तीवर भर दिला होता. विहिरींची स्वच्छता, गाळ काढण्याची कामे दरवर्षी केली जातात. यावर लाखो रुपये खर्च केले जातात. गेल्या तीन वर्षांत महापालिकेने गाळ काढण्यासाठी पावणेचार कोटी रुपये खर्च केले, तर लघु नळ योजनेसाठी सव्वापाच कोटी, असे एकूण नऊ कोटी रुपये खर्च केले.
शहरात पावणे आठशे विहिरी आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त विहिरी दूषित झाल्या आहेत. शहरातील इंग्रजकालीन सिवेज लाईन जीर्ण झाल्या असून, अनेक भागात पाणी रस्त्यावर वाहत आहे, तर काही भागातील विहिरींमध्ये सांडपाणी जात आहे. परिणामी शहरातील विहिरी दूषित झाल्या आहे. दरवर्षी या विहिरींची स्वच्छता केली जाते, यावर खर्च केला जातो. परंतु विहिरींच्या दूषित होण्याच्या कारणाकडे, अर्थात सिवेज लाईनच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विहिरींची स्वच्छता केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्या दूषित होत आहे. परिणामी या विहिरींच्या पाण्याचा वापरही नागरिक करीत नाही. विशेष म्हणजे या विहिरी स्वच्छ करून महापालिकेने लघु नळ योजनाही बसवली. यावरही वेगळा खर्च करण्यात आला. या नळ योजनेचाही नागरिकांना कितपत लाभ होतो, याबाबतही शंका आहे. अनेक नागरिक केवळ नळाचेच पाणी वापरतात. नागरिकांनी बाहेरच्या वापरासाठी नळयोजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. परंतु विहिरीच दूषित असल्याने त्याकडे कुणी ढुंकूनही पाहात नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
बोअरवेलवर चार कोटी खर्च
महापालिकेने शहराच्या विविध भागात बोअरवेल तयार केल्या. २०१६-१७ ते २०१९-२० या वर्षात ४४१ बोअरवेल तयार करण्यात आल्या असून, यावर ३ कोटी ९६ लाख ९० हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु यातील अनेक बोअरवेल बंद स्थितीत आहे.
स्वच्छता केलेल्या विहिरींची संख्या (वर्ष - विहिरी)
२०१९-२० : ५०२
२०२१-२२ : १४८
एकूण खर्च : ३ कोटी ७३ लाख ३२ हजार ८६४ रुपये
विहिरींवर लघु नळ योजना (वर्ष-विहिरींची संख्या)
२०१८-१९ : ९०
२०१९-२० : १४०
२०२०-२१ : १३
एकूण खर्च : ५ कोटी २१ लाख २४ हजार ७५० रुपये