रामटेक (Ramtek) : प्रभू श्रीरामाच्या गडमंदिर ते रामटेक शहरातील जैन मंदिर दरम्यानच्या दोन किलोमीटर रोडचे तीन वर्षांपूर्वी मजबुतीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. या रोडच्या दोन्ही बाजूंनी मुरूम टाकण्यात आला नाही. त्यातच रोडच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे असल्याने वळणावर समोरून येणारी वाहने व्यवस्थित दिसत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
रामटेक तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत गड मंदिर ते रामटेक शहरातील बर्वे शाळा या दोन किलोमीटर मजबुतीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. ही काम करताना रोडलगत असलेल्या दोन्ही बाजू मुरूम टाकून सपाट करणे अत्यावश्यक असताना कंत्राटदाराने याकडे लक्ष दिले नाही. हा मार्ग अरुंद व वळणदार असून, दोन्ही भागाला जंगल असल्याने वळणांवर झाडांमुळे समोरून येणारी वाहने व्यवस्थित दिसत नाही.
हा रोड पूर्वीपेक्षा दोन फूट उंच तयार करण्यात आला आहे. मात्र, रोडलगतच्या सुरक्षा भिंतीची उंची वाढविण्यात आली नाही. रुंदी कमी - असल्याने वाहने क्रॉस करताना अडचणी येतात. त्यातच वाहनांचा वेग अधिक असल्यास अपघात होण्याची शक्यताही असते. शिवाय, रोडलगत 1 खोलगट भाग असल्याने वाहने खोल दरीत शिरण्याची भीती असते. कारण, सुरक्षा भिंतीला लागून काही ठिकाणी 100 ते 300 फूट खोल दरी आहे. त्यामुळे या मार्गावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी वेळीच योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
पथदिव्यांची व्यवस्था करणार कधी?
या मार्गावर भाविकांची रोज व वर्षभर गर्दी असते. शिवाय, लगतच्या जंगलात बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. पूर्वी या मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. केबल तुटल्याने ते पथदिवे बंद आहेत. मात्र, केबल दुरुस्त करून पथदिवे सुरू करण्याची तसदी प्रशासनाने अद्याप घेतली नाही. त्यामुळे भाविकांसह इतरांच्या जिवाला वन्यप्राण्यांपासून धोका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.
रखडलेली कामे पूर्ण करा
राज्य सरकारने रामटेक विकास योजनेंतर्गत 150 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात 49 कोटी रुपयांची कामे मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. त्याच निधीतून या रोडचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले. गडावरील कालिदास स्मारक आणि गड मंदिर संकुलातील दोन शौचालयांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. स्वागत गेट, प्रवासी निवास यासह अनेक कामे रखडली असून, ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीही केली जात आहे.