नागपूर (Nagpur) : रेल्वेच्यावतीने नागपूर ते यवतमाळ दरम्यान तिसरा मार्ग (थर्ड लाईन) टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजुला राहणाऱ्या सुमारे सोळाशे झोपडपट्टीधारकांना बेघर व्हावे लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने जागा रिकामी करण्याची नोटीस सर्वांना पाठविली आहे.
रुळांच्या शेजारी मागील पाच दशकांपासून हजारो नागरिक वास्तव्यास आहे. रामबाग, इंदिरानगर, जाटतरोडी, सरस्वतीनगर, तकिया परिसरातील सोळाशे कुटुंबियांत बेघर होण्याची भीती सतावत आहे. कोणीतही ही अडचण दूर करावी याकरिता झोपडपट्टीधारक पुढाऱ्यांच्या दारोदारी फिरून निवेदन देत आहेत. विशेष म्हणजे यातील अंशी टक्के वस्त्या या माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात येतात.
सुमारे ५० वर्षांपासून येथे नागरिकांची वस्ती आहे. महापालिकेने त्यांना मालकी हक्क पट्टेही दिले आहेत. रेल्वेने ही जागा खाली करण्यासाठी सोळाशे कुटुंबीयांना नोटीस बजावली. त्यामुळे तीन पिढ्यांपासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांत खळबळ माजली आहे. या भागात १०० वर्षांपूर्वी एम्प्रेस मिलकडे जाणारी रेल्वेलाईन टाकण्यात आली होती. गेल्या ७५ वर्षांपासून या लाईनचा कोणताही उपयोग झाला नाही. नंतरच्या काळात महापालिकेने नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे दिले आणि ते महापालिकेला कर सुद्धा देत आहेत. वीज मंडळाने त्यांना वीज जोडणीसुद्धा दिली आहे.
केंद्र सरकारकडे जाणार
या भागातील नागरिकांशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. गरज पडली तर याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर बैठक घेण्यात येईल. पण, कुठल्याही स्थितीत या नागरिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिले.