नागपूर (Nagpur) : नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या (NIT) विकास आराखड्यात बेसा ते बेल्हारीपर्यंत 24 मीटर रुंद रस्ता मंजूर आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) येथे केवळ 20 ते 22 मीटर रुंद रस्ताच बनवत आहे. रस्त्याचा एक टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. लोकांच्या आणि रहदारीच्या गरजा लक्षात घेऊन सरकार रुंद रस्ते करण्यावर भर देत आहे, तर पीडब्ल्यूडी रुंद रस्ते आणखी कमी करण्याचे काम करत आहे. बेसा ते बेल्हारी हे अंतर सुमारे अडीच किलोमीटर आहे.
बेसा ते घोगली या एक किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याची रुंदी कुठे 20 मीटर तर कुठे 22 मीटर आहे. 24 मीटर रुंद रस्ता कुठेही करण्यात आला नाही. सध्या घोगली ते बेल्हारी या दीड किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. येथेही केवळ 20-22 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा आहे. म्हणजेच विभागाची इच्छा असेल तर तो संपूर्ण 24 मीटर रुंद रस्ता बनवू शकतो.
रस्त्याची रुंदी कमी करणे धोकादायक
सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केलेल्या रस्त्याची रुंदी कमी केली आहे. 24 मीटरचा रस्ता 20 मीटरपर्यंत कमी करण्यात आला असून, हे जीवघेणे ठरू शकते. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले असून, तेथेही 20 ते 22 मीटर रुंद रस्ता तयार केला जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अपघाताचा धोका वाढणार आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा आहेत. कोणाचेही अतिक्रमण नाही. तरी ही रस्ता रुंद करण्यात आलेला. हा प्रकार भविष्यात धोका निर्माण करणारा ठरणार असल्याच्या स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
पोल केबल, पाइपलाइनमुळे रुंदी कमी झाली
विकास आराखड्यात हा रस्ता 24 मीटर रुंद आहे. रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम चार महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून, विद्युत खांब, केबल, पाइपलाइनमुळे रस्त्याची रुंदी 20 ते 22 मीटर करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले असून संपूर्ण 24 मीटरचा रस्ता करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पोल, केबल व पाईपलाईन स्थलांतराचा खर्च जास्त असल्याने काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी होऊ शकते. बहुतांश ठिकाणी खांब टाकून रस्ता 24 मीटर रुंद करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती बांधकाम विभागाचे सार्वजनिक अभियंता सी. गिरी यांनी दिली.
बेसा, बेल्हारी, पिपळा, बेलतरोडी, शंकरपूर परिसराला नवीन नागपूर म्हणतात. नागपूर शहरात कमी जागा शिल्लक राहिल्याने लोकांचा ओढा नवीन नागपूरकडे अधिक असल्याचे दिसते आहे. गेल्या काही वर्षांत येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. टाउनशिप, घरे, फ्लॅट स्कीम आणि लोकसंख्या वाढल्याने वाहतूकही झपाट्याने वाढते आहे.
या मार्गावर अवजड वाहनांबरोबरच स्टार बसेसही धावतात. भविष्यात येथे टप्प्याटप्प्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. रस्ते अपघाताचा धोकाही वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.