नागपूर (Nagpur) : बेला सोनेगाव (लोधी) दरम्यान वाहणाऱ्या वेणा नदीवर 45 वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्या पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे कित्येक महिन्यांपूर्वीच तुटलेले आहेत. त्यामुळे या पुलावरून वाहन नदीत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संरक्षक कठडे कधी लावणार, असा प्रश्न या भागातील नागरिकांसह वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. तरीही याकडे सरकारचे लक्ष नाही.
या पुलाची उंची मुळात कमी असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहते आणि या मार्गावरील वाहतूक तासन्तास ठप्प होते. हा प्रकार दरवर्षी पावसाळ्यात किमान चार पाचदा घडतो. पूर्वी या पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी संरक्षक कठडे होते. पुराच्या पाण्यामुळे ते गंजले आणि टप्प्याटप्प्याने तुटून पुरासोबत वाहत गेले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी नव्याने संरक्षक कठडे लावण्याची मागणी करूनही तसदी घेतली नाही. अलीकडच्या काळात या पुलावरून जड व ओव्हरलोड वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. या पुलावरून शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसोबत प्रवासी वाहतूक करणारी छोटी-मोठी वाहनेही नियमितपणे धावतात. मात्र, पुलाची वजन क्षमता ही त्या वाहनांच्या तुलनेत फारच कमी आहे. या पुलाची रुंदी कमी असल्याने तसेच त्याला संरक्षक कठडे नसल्याने वाहने ओव्हरटेक करताना किंवा क्रॉस होताना तसेच रात्रीच्यावेळी अंधारात वाहन पुलावरून नदीत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुलाची उंची व रुंदीही कमी
बेला-सोनेगाव (लोधी) मार्ग नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला असल्याने तसेच बेला परिसरात साखर कारखाना, उमरेड परिसरात कोळसा खाण व इतर उद्योग असल्याने या रोडसह पुलावरील जड वाहनांच्या रहदारीत मोठी भर पडली आहे. या पुलाची निर्मिती 45 वर्षांपूर्वीची रहदारी लक्षात घेत करण्यात आल्याने त्याची उंची आणि रुंदी कमी आहे. आता वाढलेली रहदारी विचारात घेता येथे रुंद व उंच पुलाचे बांधकाम करणे व त्याला मजबूत संरक्षक कठडे लावणे अत्यावश्यक आहे.
पंचायत समितीचा ठराव
या पुलावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळीच योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे उमरेड पंचायत समितीने मासिक सभेत या नदीवर उंच व रुंद पुलाचे बांधकाम करावे, असा ठराव पारित केला आणि ठरावाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविली. सध्या या पुलावर पुलाच्या कडा रात्रीच्यावेळी लक्षात येण्यासाठी किमान रेडियमचे रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे.