नागपूर (Nagpur) : मागील वर्षीपासून सुरू असलेल्या अरोली कन्हान सिमेंट रस्त्याच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बांधकाम कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आलेला आहे. बांधकामात मुरूम ऐवजी मातीचा आणि खोदकाम केलेल्या निकृष्ट डांबराचा वापर करणे, योग्य मळणी न करणे आदिसह बऱ्याच बाबी पुढे आल्या. बांधकामाच्या नियमाची पायमल्ली करीत सुरक्षेच्या दृष्टीने कसलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
मौदा, पारशिवनी आणि रामटेक तालुक्यातील मिळून 104 किलोमीटरच्या सीमेंट रस्ता बांधकामाकरिता 405 कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखित सदर रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम करण्यात येत आहे. रस्त्याच्या बांधकामात मळणीपूर्वी खोदकामाची माती, खोदलेला निकृष्ट दर्जाचा डांबर आणि मातिमिश्रित मुरूम वापरण्यात आला. लोकांच्या नजरेत पडू नये म्हणून त्यावर थोड्या प्रमाणात मुरूम टाकून बोरवण घालण्यात आली. त्याची पाणी टाकून मळणी (कॉम्पेक्षण) करणे गरजेचे असतांना थातूमातुर मळणी करण्यात येत आहे. त्यामुळे सदर रस्ता दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती कमी आहे. सुरवातीपासूनच सदर रस्त्याच्या बांधकामाबाबत नाना प्रश्न निर्माण होत असून देखील शासन प्रशासन गंभीर नाही.
जनतेच्या पैश्याची लूट :
जनतेचा पैसा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने वापरण्यात येत असून त्याची गुणवत्ता असणे तितकेच गरजेचे असते. मात्र निगरगट्ट सार्वजनिक बांधकाम विभागाला सार्वजनिक कसलेही हित दिसून येत नाही. जेणेकरून बांधकाम विभाग टक्केवारीच्या नादात बांधकाम कंपनीच्या दावणीला बांधल्यागत झाला आहे.
आणखी किती जीव घेणार :
बांधकामावर कसलीही सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने रोजचे अपघात घडतात. कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे नियम धाब्यावर ठेवीत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे 18 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात सुनील शिवशंकर नारनवरे (वय 38 वर्ष रा. कुंभारी) आणि अनन्या प्रमोद शेंडे (वय 5 वर्ष रा. केतापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. रोजच्या होणाऱ्या अपघातात कुणाचे हातपाय तुटतात. तर कुणी गंभीर जखमी होऊन जीवनभर अपंगतत्व भोगावे लागते. मात्र यावर संबंधित विभाग गंभीर नाही.
राजकीय वरदहस्त :
सदर रस्त्याचे बांधकाम ज्या बांधकाम कंपनीकडे आहे ती कंपनी मोठ्या राजकीय नेत्याच्या नातेवाईकाची असल्याची माहिती आहे. बांधकामात वाळू, मुरूम आणि ट्रकचे कॉन्ट्रॅक्ट आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य आदिसह पदाधिकाऱ्यांना मिळाले आहेत. त्यामुळे सगळे राजकीय नेते चिडीचूप असून बांधकामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. जनतेचे सेवक असल्याच्या बोंबा मारणारे राजकीय नेते आपले हात ओले करीत जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे.
पाच वर्षीय चिमूकलीच्या कुटुंबीयांना नाही मदत :
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बांधकाम कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघात घडताहेत. वारंवार निदर्शनात आणून देखील कसलीही दखल घेतल्या जात नाही. सुनील नारनवरे या पहेलवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने लोकांनी आणि काहींनी कंपनीच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आणि अखेर मृतकच्या परिवारास जवळपास 35 लाखाची मदत मिळाली. मात्र पाच वर्षीय अनन्या शेंडे या चिमूकलीचा रस्ता बांधकामात मुरूम वाहून नेणाऱ्या ट्रक अपघातात मृत्यू झाला. त्याचबरोबर प्रमोद शेंडे (वडील) हे गंभीर जखमी झाले. कोणत्याही राजकीय नेते आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संघटनांनी कसलीही भूमिका न घेतल्याने अनन्या च्या गरीब कुटुंबीयांना आणि प्रमोद यांच्या उपचारकरिता कसलीही मदत मिळाली नाही. हि या भागातील राजकीय नेत्यासाठी शरमेची बाब आहे. या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मौदा चे उपविभागीय अभियंता संदीप पचकावडे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, डायरेक्शन बोर्ड आणि पट्ट्या लावण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक शहरात असतात. ग्रामीण भागात नाही. तो अपघात नॅशनल रस्त्यावर झाला.