नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात घर घेणे आवक्याच्या बाहेर गेले आहे. बँका पगाराचा आकाड बघून कर्जही देत नाहीत. दुसरीकडे ग्रामीण भागात गेल्यास कुठल्याच सुविधा मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडून (NMRDA) शहराच्या सभोवती सुविधा उभारल्या जाणार आहेत. नागपूर शहराच्या सभोवतालच्या भागात दोनशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर १९० कोटी रुपये खर्च करून सिव्हेज लाईन टाकली जाणार आहेत. त्यामुळे आता शहराच्या सभोवती असलेल्या ग्रामीण भागात घर घेतले तरी नागरिकांना सुविधा मिळूणे सोपे होणार असल्याचे NMRDA कडून सांगण्यात आले. या कामांचे टेंडर काढण्यात आल्याचे NMRDAचे संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.
रस्त्यांच्या कामाला सुरवात झाली असून, आता शहरातील वर्दळ कमी होईल आणि ग्रामीण भागातही शहराप्रमाणेच सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला. या निधीतून तब्बल ५५ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे. नागपूर आता चांगलेच गजबजले आहे. टूबीएचके फ्लॅटचा दर सरासरी ६० लाख रुपये झाला आहे. मोकळे भूखंड सर्वसामान्य नोकरदार घेऊच शकत नाहीत इतके दर काडाडले आहेत. १५०० चौरस फुटांचा प्लॉट घेऊन घर बांधायचे झाल्यास किमान एक कोटींची गरज भासते. त्यामुळे तुलनेत स्वस्त आणि हवेशीर, नियोजनबद्ध भागात फ्लॅट खरेदीला आता नागरिक पसंत देऊ लागले आहेत.
दक्षिण नागपूरचा भाग असलेल्या बेसा, बेलतरोडी, शंकरपूर, पिपळ, हुडकेश्वर, नरसाळा या शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फ्लॅट स्कीम उभ्या राहात आहेत. नवे नागपूर या भागात वसले जात आहे. मात्र पाणी, रस्ते, सिवेज लाईन ही अडचण होती. ती आता लवकरच दूर होणार आहे. विशेष म्हणजे येथे भूखंड घेणाऱ्यांची फसगत होऊ नये याकरिता महारेरा कायद्याचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची खरेदी वाढली आहे. सर्वच सुविधा झपाट्याने निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांची पसंतीही या भागात वाढत चालली आहे.