नागपूर (Nagpur) : ग्रीन सिटी, स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या उपराजधानी नागपुरात प्रदूषणाबाबत सरकारी यंत्रणा किती बेफिकीर आहे हे हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी लावलेल्या चार यंत्रांपैकी तीन यंत्रांवरील आकडेवारी संकेतस्थळावर दिसत नसल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारचे प्रदूषण नियंत्रण मंडळही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यानिमित्ताने नागपूरला स्वच्छ शहराच्या स्पर्धेतून डावलण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या उपराजधानीत औद्योगिक क्षेत्रासह वाहनाची संख्या, पायाभूत सुविधांचे कामे झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात हवेची गुणवत्ता मोजणारी चार यंत्रे उपलब्ध करून दिले आहेत. दूषित हवेचा आरोग्यावर होणारा परिणाम किंवा आरोग्यास निर्माण होणारे धोके समजणे हा त्याचा हेतू आहे. मात्र, शहरातील महाल, व्हीएनआयटी आणि एलआयटी कॉलेजमधील यंत्रणा अद्यापही कार्यान्वित झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून त्या सुरु असल्याचे म्हटले जात आहे. त्याची आकडेवारीही आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे. परंतु, ती आकडेवारी संकेतस्थळावर दिसत नाही. त्यामुळे ‘जंगल मे मोर नाचा किसी ना देखा है‘ अशी स्थिती या यंत्राची आहे. महाल परिसरात वाहनांची वर्दळ अधिक असून बांधकाम, पाडकाम आणि काही उद्योगही आहेत. त्यामुळे त्या परिसरात अधिक प्रदूषण आहे. मात्र, यंत्राची आकडेवारी दिसत नसल्याने तेथील स्थिती काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
हवा झाली खराब
हवेतील गुणवत्ता पातळीचे प्रमाण १०० पीएमपेक्षा (पार्टिक्युलेट मॅटर) अधिक असू नये, असे तज्ज्ञ सांगतात. एप्रिल आणि मे महिन्यात गेल्या पंधरा दिवसापासून या आकड्याने शंभरी पार केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, १३ एप्रिल ते तीन मेपर्यंत हवेची गुणवत्ता पातळी (एक्यूआय) १४० ते २१९ आहे. त्यात २१ एप्रिलला सर्वाधिक हवेची गुणवत्ता पातळी २१९ नोंदविण्यात आले आहे.
हवेची गुणवत्ता मोजणारे सिव्हिल लाईन्समधील यंत्र सुरु असून त्याची आकडेवारी संकेतस्थळावर नियमित दिसत आहे. महाल, व्हीएनआयटी आणि एलआयटी कॉलेजमध्येही सयंत्र आहेत. त्यामध्ये हवेची गुणवत्ता मोजण्यात येत आहे. मात्र, ते मंडळाच्या संकेतस्थळावर दिसत नाही. ते दिसावे म्हणून केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा केला जात आहे.
- अशोक करे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ