नागपूर (Nagpur) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या ११ डिसेंबर रोजी नागपुरात येत आहेत. यादरम्यान ते नागपूर मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता मेट्रोतील सुत्राने व्यक्त केली. पंतप्रधान खापरी ते झिरो माईल, या वर्धा मार्गावरील मेट्रोतून नागपूर बघणार असल्याचा अंदाज वर्तविलाजात आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय डॉ. ब्रजेश दिक्षित यांना याबाबत विचारले असते, अजून वेळ आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु या मार्गावरील डबल डेकर पूल चकाचक करण्यात येत असल्याने पंतप्रधानांच्या मेट्रो सफारीची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळा मिहानमधील एम्स रुग्णालयाच्या मागील भागात होणार आहे. येथून जवळच खापरी मेट्रो स्टेशन आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते झिरो माईलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोतून प्रवास करणार असल्याची सुत्राने नमुद केले.
विशेष म्हणजे महामेट्रोचीही त्याअनुषंगाने तयारी सुरू केली आहे. वर्धा मार्गावरील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या डबर डेकर पुलाचे डांबरीकरण, येथील दुभाजकांवर लावलेल्या झाडांची कापणी आदी कामे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू मार्गाचेही लोकार्पण करण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यावर महामेट्रो प्रशासनात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. वर्धा मार्गावरील ट्रॅक, स्टेशनची स्वच्छता आदी करण्यात येत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांनी पंतप्रधानांच्या मेट्रोतून प्रवासाबाबत अद्याप ठरले नाही, कार्यक्रमाची जुळवाजुळव सुरू आहे, येत्या एक दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.