नागपूर (Nagpur) ः बहुप्रतिक्षित असलेल्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या विकासाचे रेंगाळलेले टेंडर (Tender) लवकरच निघणार आहे. कालच याकरिता ४८७ कोटींच्या निधीला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी प्रदान केली आहे. रेल लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीकडे (आरएलडीए) आलेल्या टेंडरची तांत्रिक पडताळणी झाली असून, ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. (Nagpur Railway Station Redevelopment Tender)
स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी ४८७ कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. या कार्यादेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. मध्यवर्ती रेल्वे स्थानक इंग्रजकालीन आहे. या स्थानकाच्या बांधकामात लाल दगडाचा उपयोग करण्यात आला. त्यामुळेच रेल्वे स्थानकाचे सौंदर्य आजही कायम आहे. रेल्वे स्थानक हेरिटेज वास्तूंच्या यादीत असल्याने स्थानकाचे जुने स्वरूप कायम राखून जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे मुख्य लाल दगडाच्या हेरिटेज वास्तूचे सौंदर्य अबाधित राहणार आहे.
मुख्यतः हेरिटेज लूक अधोरेखित करण्यासाठी स्थानकाच्या लगतच्या इमारती पाडून आधुनिक सुविधा देण्याची योजना आहे. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकात नागपूर रेल्वे स्थानकाचा उल्लेख होतो. संत्रानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. हावडा-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गांचे जंक्शन आहे. जवळपास २५४ मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या स्थानकावर थांबतात. महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि व्यस्त स्थानकांपैकी नागपूर स्थानक एक आहे.
हे होणार बदल...
स्थानकाच्या पुनर्विकासाच्या या कामामध्ये मल्टी मॉडेल इंटिग्रेशन रेल्वेस्थानक, मेट्रो स्थानक आणि मल्टी-लेव्हल कार पार्किंगला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या माध्यमातून काम होणार आहे. त्याचप्रमाणे स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम भागात डिपार्चर हॉलला जोडणारा एक रूफ प्लाझा बांधण्यात येईल. यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक कॉमन वेटिंग एरिया प्लॅटफार्मच्या वरच्या बाजूला असेल. त्यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी अडचण होणार नाही. स्थानकाच्या विकासाचे हे मॉडेल भारतीय प्रवाशांना जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव देणारे ठरेल. तसेच स्टेशनचा पुनर्विकास, नवीन योजना, रेल्वे कॉलनीचा विकास, नवीन बांधकाम आदी कामे या अंतर्गत केली जाणार आहेत.