नागपूर (Nagpur) : मिहान प्रकल्पात सुमारे पाच वर्षांपासून बाबा रामदेव यांच्या पंतजली फूडपार्क सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात पतंजलीची पिठ गिरणी सुरू होत असल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) अध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली. (Patanjali Food Park Mihan Nagpur)
पतंजलीचा संपूर्ण प्रकल्प सुमारे पाचशे कोटींचा आहे. त्यात पिठ गिरणीचाही समावेश आहे. या गिरणीत सुमारे दीडशे कोटींची गुंतवणूक पंतलीने केली आहे. कपूर म्हणाले, मिहानने निर्यातीत भरीव वाढ केलेली आहे. तसेच आरोग्य, औषधनिर्माण, कृषी, आयटी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळविले आहे, एमएडीसीच्या माध्यमातून मिहानमध्ये ग्रीन एनर्जी आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पतंजली फूड पार्क, पंचतारांकित हॉटेल, रुग्णालय, कल्पना एव्हिएशन एमआरओ, प्रस्तावित दहेगाव मनोरंजन प्रकल्पांचीही माहिती तत्पूर्वी कपूर यांनी जाणून घेतली. मिहानमधील पायाभूत सुविधांचा विकास आणि विविध सुविधांशी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. वडगाव धरणातील सौर ऊर्जेचा पर्याय शोधण्यावर त्यांनी भर दिला. पाणी मिहान प्रकल्पात आणले जात आहे. तसेच मिहानमधील सध्याचे पथदिवे एलईडी दिवे लावून बदलण्यावर भर दिला. मिहानमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. मिहान परिसरातील अग्निशमन आणि सुरक्षा व्यवस्था यावरही चर्चा करण्यात आली. यावर्षी ऑगस्टमध्ये एमएडीसी आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत एक दिवसाचे अधिवेशन घेतले जाईल, असेही स्पष्ट केले. येथील पतंजली फूड अँड हर्बल पार्कच्या विविध पदाधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील विलंबाबाबत प्रदीर्घ चर्चा केली. त्यांनी पतंजली समूहाने येत्या काही आठवड्यांत पिठाची गिरणी सुरू करण्याबाबत स्पष्ट केलेले आहे.
अग्निशमन, सुरक्षा, वीज, दूरसंचार, ब्रॉडबँड, पाणीपुरवठा इत्यादी विविध सुविधांसाठी अधिकाऱ्यांच्या गटाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत मिहानमधील या सर्व सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. भविष्यात मिहानचा विकास आणि सुविधा देण्यावर भर राहणार आहे. मिहानमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यास वचनबद्ध असल्याचेही दीपक कपूर यांनी स्पष्ट केले.