नागपूर (Nagpur) : सिमेंट आणि डांबरी रस्त्यांच्या कामात वापरलेल्या साहित्याची तपासणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) प्रयोगशाळेत केली जाते. मात्र मागच्या तीन वर्षांत साहित्याचा एकही नमुना निकृष्ट असल्याचा अहवाल दिलेला नाही. जर सर्वच नमुने उत्कृष्ट होते तर मग या साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा दर्जा एवढा तकलादू आहे की अवघ्या काही महिन्यांतच ते खराब झाल्याचे दिसून येते. सिमेंटचे रस्ते तब्बल ५० वर्षे टिकणार असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षातले वास्तव मात्र किती भीषण आहे हे वेगळे सांगायला नको.
रस्त्यांची मजबुती दीर्घकाळ टिकून राहावी यासाठी नागपूरसह राज्यभरात सिमेंट आणि डांबरी रस्ते तयार केले जात आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून रस्त्यांना 50 वर्षांचे आयुष्य असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात सिमेंट रस्ते काही दिवस-महिनेच टिकतात आणि लवकरच त्याचे निकृष्ट दर्ज्याचे काम दिसू लागते.
चांगल्या दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी करतात. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रयोगशाळा ही चांगल्या मानकांवर चाचणी केल्याचा दावा करते. विशेष म्हणजे प्रयोगशाळा प्रबंधक यांनी तीन वर्षांत एकही सामग्री निकृष्ट दर्ज्याची असल्याचे सांगितले नाही. स्काडा प्रक्रियेत सर्वोत्तम मशिन्समधून निरीक्षण केल्याचा दावा केला जात आहे, परंतु या सर्व दाव्यांनंतर प्रत्यक्षात सिमेंट आणि डांबरी रस्त्यांची दुरवस्था मात्र सर्वत्र दिसून येत आहे.
लोकनिर्माण विभाग परिसरात प्रादेशिक प्रयोगशाळेची स्थापना 1979 करण्यात आली होती. या प्रयोग शाळेचे संचालन विभागाचे समन्वयक आणि विभाग करते. 1980 साली 6 जिल्ह्यांमधील शासकीय इमारती आणि रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या तपासणीची जबाबदारी या प्रयोगशाळेला देण्यात आली होती. 1991 मध्ये प्रयोगशाळेत बदल करून नवीन उपकरणे आणण्यात आली. सुमारे 15 वर्षांपूर्वी इतर जिल्ह्याना काढून नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे काम जोडले गेले. जानेवारी 2020 मध्ये 60 लाख रुपये खर्च करून प्रयोगशाळेचे नुतनिकरण करून आयएसओ प्रमाणित करण्यात आले. तरी सुद्धा मागील 3 वर्षात झालेल्या साहित्य परिक्षणात एकही प्रकरण निकृष्ट दर्ज्याचे निघाले नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेत मिक्स डिझाइन, बिटुमेन (डामर), काँक्रिट, स्टील यासह एकूण (मुरुम, गिट्टी, सिमेंट ब्लॉक) चाचण्या केल्या जातात. तीनही जिल्ह्यातून दर महिन्याला 200 हून अधिक साहित्य पोहोचते. हे साहित्य 7 प्रमुख प्रकारच्या स्काडा प्रक्रियेत मशीनद्वारे तपासले जाते. मशिनमध्ये सामग्री टाकताच गुणवत्ता अहवाल येतो.
या अहवालात कोणताही बदल शक्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय सरकारी इमारतींची वाळू, गिट्टी, सिमेंट, लोखंड यांचीही तपासणी केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांत तीन जिल्ह्यांतील निकृष्ट दर्जाच्या प्रकरणांचा तपशीलही प्रयोगशाळा व्यवस्थापनाकडे नाही. अशा स्थितीत साहित्याचे योग्यरित्या परिक्षण झाले किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.