नागपूर (Nagpur) : कागदोपत्री टेंडर (Tender) काढल्याचे दर्शवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आल्यानंतर हिंगणा बाजार समितीतील (APMC Hingna) अनियमिततेच्या चौकशीचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बघितले जाते. शेतकऱ्यांच्या हिताच्या नावावर याठिकाणी साहित्य खरेदी व इतर विकासकामांच्या नावावर प्रशासकीय यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून लाखो रुपयांची अनियमितता झाल्याची तक्रार माजी संचालक शेषराव नागमोते यांनी विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे केली होती. त्यांची शहनिशा केल्यानंतर उपनिबंधकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक यांनी देले.
२०१८ ते २०१९ या कालावधीत एका कंस्ट्रक्शन कंपनीला सेफ्टिक टँक बांधकाम, मुख्य बाजार शेड व इतर काम देण्यात आले होते. त्या करिता बनावट टेंडर तयार करण्यात आले आहेत. उपबाजार सावंगी (आसोला) येथे तारेच्या कुंपणाचा ठराव घेण्यात आला होता. त्याचा दोन लाख ९६ हजार ४०० रुपयांचा खर्च मुख्य बाजार बांधकाम खात्यात दाखविण्यात आला. वे-ब्रीज खरेदीतही आर्थिक अफरतफरीचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सावंगी (आसोला) येथे वे-ब्रीज रॅम्प बांधकामाचा खर्च, शेड क्रमांक तीनचे वॉटर प्लांट कंस्ट्रक्शन, तसेच स्वच्छतागृह बांधकामाचे दोन लाख ९२ हजार रुपयांचे बांधकाम दाखविण्यात आले. मात्र यापैकी एकही बांधकाम अस्तित्वात नाही. डेड स्टॉक विक्रीचा कुठलाही मासिक ठराव सभेत घेण्यात आला नाही. त्यानंतरही सर्व साहित्याची परस्पर विक्री करण्यात आली.
या रकमेची कुठेही नोंद नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
इलेक्ट्रॉनिक काटे दुरुस्तीच्या नावाखाली खोटे बिल दाखवून रक्कम हडपली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या १३ मुद्यांसंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करून दोषींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक संजय कदम यांनी दिले आहेत.